मी कॉलेज कट्टाचा प्रतिनीधी म्हणून जॉईन झालो होतो, तो काळ होता 1992 चा ! त्या काळात पत्रकारीतेच्या निमित्ताने पुण्यातील बहतांश लेखकांशी माझा संपर्क आला. त्यातीलचं एक प्रसिध्द लेखिका म्हणजे माझ्या लाडक्या स्व.शांता आजी अर्थातच शांता ज.शेळके, खरं तर शान्ता आजींनी मला अगदी नातवाप्रमाणे प्रेम दिलं, त्या काळात मोबाईल नव्हते, लॅण्डलाईनचा जमाना होता, ज्या ज्या वेळी त्यांना गप्पा माराव्याशा वाटत त्या त्या वेळी त्या मला कॉलेज कट्टाच्या कार्यालयात फोन करुन त्यांच्या पुण्यातील आदर्शनगर येथील घरी बोलवत असतं, असाचं एक प्रसंग आजही मला लख्खपणे आठवतो, मी कॉलेज कट्टाच्या कार्यालयात लेखन करीत बसलो होतो, इतक्यात फोन खणखणला, संदिप कुलकण नावाच्या व्यक्तीने तो उचलला आणि माझ्याकडे दिला. तर समोरुन शांता आजी बोलत होत्या. ‘मदन मी आजारी आहे, भेटायला येतोस का?’ म्हणून त्यांनी आग्रह केला. मला वाटलं बहुदा हॉस्पिटलमध्ये जायचे असावे म्हणून मी तातडीने गेलो, घरी पोहोचलो तर त्या कॉटवर पहुडल्या होत्या, मला पाहिल्यानंतर त्या चटकन उठल्या, एक काम कर हे पैसे घे, त्यांनी हातावर काही पैसे ठेवले आणि सातारा रोडवरुन चांगले द्राक्ष घेवून ये, गोड बघून आण, मी गाडीवर सातारा रोडला गेलो, द्राक्ष घेवून आलो, मला वाटलं त्या आजारी आहेत म्हणूनचं त्यांनी मला द्राक्ष आणायला सांगितली, मी द्राक्ष आणल्यावर त्या म्हटल्या, ती द्राक्ष चांगली धुवून घे आणि ताटात घेवून खा, माझ्या समोर बैस, हे ऐकुण मी भावुक झालो, अरे तू कामात असतोस वेळेत खाणं होत नसेल म्हणत, त्या खुप भावनिक झाल्या होत्या, त्यांना अस्वस्थ वाटत होतं म्हणून त्यांनी मला बोलावलं होतं, तो प्रसंग आजही मला आठवला की, डोळ्यात पाणी उभं राहतं आणि आजीच्या त्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या काळातले सर्व साहित्यिक खरचं एकमेकांना निस्वार्थपणे मदत करायचे, मला कवी संमेलनाला जाता यावे, म्हणून त्या स्वत: आयोजकांना माझे नाव सुचवायच्या, खुप भावनिक होत्या त्या, तिततक्याचं हळव्याही, खरचं अशा साहित्यिक पुन्हा होणे नाही, त्या जशा लिहीत, तशाचं त्या खऱ्या आयुष्यातही वागत असतं, म्हणूनच त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीचं आपुलकी आणि प्रेम असायचं, त्या तितक्याचं हक्काने मला त्यांचे लेख घेवून सकाळ, पुढारीच्या कार्यालयात पाठवायच्या, ते लेख जेंव्हा प्रसिध्द व्हायचे तेंव्हा मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यांच्या संपर्कातील सर्व लेखक मला नावानिशी ओळखायचे, त्या काळात माझ्यासारख्या नवख्या लेखकाला त्यांच्यामुळे मान-सन्मान मिळाला, आणि हक्काने माया लावणारी आजीही लाभली. पण आज त्या आपल्यात नाहीत याचं मनापासून दु:ख वाटतं, परंतु आजही त्यांच्या त्या आठवणी सदैव माझ्या मनात घर करुन आहेत !








