संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

कनेक्टीव्हीटी वाढल्याने जागांचे भाव कडाडले शिरुरमध्ये जागा घेणे आता बजेटमध्ये नाही उरले, सर्वोत्तम जागा,पण लोन बसेना, बजेटअभावी सर्वसामान्यांचे घोडे अडले

SHARE:

पुणे-नगर महार्गावर मोठ्या गतीने वाढत असलेले औद्योगिकरण, रांजणगांव-कारेगांव औद्योगिक परिसराचा होत असलेला मोठा विस्तार, नव्याने विस्तारत असलेले करडे येथील औद्योगिकरण, सुपा औद्योगिक परिसराची झपाट्याने होत असलेली वाढ एकुणच यानिमित्ताने पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात दळणवळणाच्या सुविधा गतीमान होत असताना त्याचबरोबर नव्याने उभा राहत असलेला पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड महामार्ग, शिरुरमधुन थेट खेड शिवापूरला जोडला जाणारा दुसरा महत्वाचा मार्ग, भीमाशंकर हायवे, अष्टविनायक महामार्ग यासारख्या गतीमान महामार्गांमुळे आता विविध राज्यांना जोडले जाणारे महत्वाचे केंद्रस्थान म्हणून शिरुरकडे पाहीले जात असल्याने शिरुर तालुका व परिसरातून जागांना सध्या प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे, यामुळेचं की काय पुण्या-मुंबईच्या बिल्डरांचे लक्षही आता शिरुरवर केंद्रीत झाले आहे. त्यामुळे साहजिकच बांधकाम क्षेत्रासह जागा खरेदी – विक्रीच्या व्यवसायाला या भागातून आता उभारी मिळत असल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे, यामुळेचं की काय पण सध्या कनेक्टीव्ही वाढल्याने जागांचे भाव कडाडले, शिरुरमध्ये जागा घेणे आता बजेटमध्ये नाही उरले, सर्वोत्तम जागा,पण लोन बसेना, बजेटअभावी सर्वसामान्यांचे घोडे अडले अशीच काहीशी परिस्थिती सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.
वाढत्या औद्योगिकरणामुळे शिरुर तालुका व परिसराच्या विकासाला चालना मिळत असतानाच आता यात नव-नव्या महामार्गाची भर पडत असल्याने शिरुरचे अंतर अगदी केंद्रस्थानी येणार आहे, शिरुर मुंबई आणि औरंगाबादच्या अगदी जवळ येणार असल्याने इथे भविष्यात नोकरी, व्यवसाय तसेच उद्योगासाठी मोठी संधी प्राप्त होणार आहे, ग्रामीण शहर म्हणून महाराष्ट्राला शिरुरची अगदी जवळून ओळख असल्याने नोकरी निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा जगाच्या कुठल्याही भागात स्थिरावला तरी रिटायरमेंटचे आयुष्य आपल्या शिरुर गावातचं घालवावे अशी इच्छा झाल्यानेच असंख्य रिटायर्ट अधिकाऱ्यांनी, स्थानिक नागरीकांनी शेती, प्लॉटींग वा फ्लॅटस मध्ये मोठी गुंतवणुक केल्याचे चित्र आहे.
वास्तविक पाहता शिरुर शहराचा भौगोलिक परिसर तसा खुप छोटा आहे, त्यामुळे शहराचा भाग झपाट्याने विकसीत झाला आणि तितक्याच झपाट्याने गुंतवणुक दारांनी इथे गुंतवणुक करुन प्रत्यक्षात त्याचा लाभही घेतला आहे, त्यामुळे सुंदर सृष्टी व सुशीला पार्क सारख्या मोठ्या सोसायट्या तेंव्हा झपाट्याने वाढल्या परंतु अशा मोठ्या सोसायट्या जागेअभावी पुन्हा उभ्या राहू शकल्या नाहीत. शिरुर शहर, तालुका व परिसराचा जागेसंदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता 8 ते 10 वर्षात जागांचे तब्बल 3 ते 5 पट रेट वाढले आहेत. जागेच्या किंमतीत इतकी प्रचंड वाढ होणारे कदाचित शिरुर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असावे. पुण्यात कल्याणीनगर, वाघोली या परिसरात सध्या जागांचे जे दर आहेत तसेच दर शिरुर शहरात व तालुक्यातील काही महत्वांच्या शहरांमध्ये अनुभवायास मिळतात. शिरुरच्या परिपूर्ण विकासाचे हे एक महत्वाचे लक्षण आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. शिरुर विस्तारतंय याबाबत नक्कीचं शिरुरकरांना निश्चितच सार्थ अभिमान आहे. परंतु शिरुरच्या मातीशी नाते सांगणाऱ्या माणसालाच आता शिरुर शहरात जागा खरेदी करण्याची इच्छा झाल्यास एन.ए.प्लॉट तर शिल्लक नाहीच पण असल्यास 30 ते 42 लाख रुपये प्रति गुंठा असा दर मोजावा लागत आहे. शिरुर शहराच्या बायपासच्या थोडेसे पुढे गेल्यास 16 लाख प्रति गुंठा एन.ए.जागांचा रेट पहायला मिळतो. बाबुराव नगर मध्ये एन.ए.प्लॉटचा साधारण 16 ते 20 लाख प्रतिगुंठा असा दर सुरु आहे.
तर बिगर एन. ए. प्रॉपटसाठी 7 लाखांपासून पुढे दर आकारला जात आहे. इथेच फ्लॅटचे दर 3000 ते 3500 प्रति स्क्वे.फुटच्या आसपास आकारले जात आहेत. शिरुर शहरात प्रति स्क्वे.फुट 3600 पासून ते 4200 रुपयांपर्यंत फ्लॅटच्या किंमती आहेत. शिक्रापूर-तळेगांव ढमढेरे -कोरेगांव भीमा येथे सध्या एन.ए.प्रॉपट अभावानेच आढळते पण बिगर एन.ए. प्रॉपटचा दर 3 ते 10 लाख प्रति गुंठा असल्याचे दिसून येत आहे. तर एन.ए. प्रॉपट 15 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत विकली जात असल्याचे दिसून येत आहे. सणसवाडीतही बिगर एन.ए.प्रॉपट 3 ते 8 लाखापासून उपलब्ध आहे तर एन.ए.प्रॉपट साधारण 12 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे मिळते आहे असे निदर्शनास येत आहे. कोरेगांव भीमा येथे बिगर एन.ए.प्रॉपट 5 ते 12 लाख प्रतिगुंठा दराने विकली जात आहे. यामुळे जागा घेणे किंवा फ्लॅट घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात उरले नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर 30 ते 40 हजार पगार असणाऱ्यांचे तर लोनच बसत नसल्याने त्यांना हक्काचे घर घेणे मुश्कील झाले आहे. एकुणचं काय तर कनेक्टीव्हीटी वाढल्याने जागांचे भाव कडाडले, शिरुरमध्ये जागा घेणे आता बजेटमध्ये नाही उरले, सर्वोत्तम जागा पण लोन बसेना,बजेटअभावी सर्वसामान्यांचे घोडे अडले असेच काहीसे चित्र सर्वत्र अनुभवायला मिळत आहे एवढे मात्र निश्चित !

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment