पुणे-शहरात विविध भागात अगदी गतीने सुरु झालेला मेट्रोचा प्रवास आता आपल्या पुणे-नगर रोडवरील रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी पर्यंत येऊ न पोहोचणार असल्याने प्रवाशांमधुन समाधान व्यक्त होताना दिसत आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी मंजूरी दिल्याने वाघोलीतील मेट्रोचा प्रवास आता सुखकर झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक मार्ग-2 ए आणि रामवाडी ते वाघोली / विठ्ठलवाडी मार्ग 2 बी या दोन उन्नतमार्गांचा समावेश या मंजूरीत करण्यात आला आहे.
दोन्हीही मार्ग आधीच्या वनाज रामवाडी फेज-1 मेट्रो मार्गाचा विस्तार करणार आहेत. या मार्गाची एकुण लांबी 12.75 कि.मी असणार आहे. या मार्गात चांदणी चौक, बावधन, कोथरुड, खराडी तसेच वाघोलीसारख्या वेगाने विकसीत होणाऱ्या उपनगरांना थेट मेट्रोसेवा उपलब्ध होणार असल्याने या भागातील कनेक्टीव्हीला आणखी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे पुण्यातील पूर्व पश्चिम दिशेतील सार्वजनिक वाहतुकील मजबूत करणे, सदर मार्ग लाईन-1 निगडी,कात्रज व लाईन-3 हिंजवडी, जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गांशी डिस्ट्रीक्ट कोर्ट या स्थानकावर जोडले जाणार आहे यामुळे प्रवाशांना अधिक जलद गतीने मार्गस्थ होता येणार आहे.
त्याचबरोबर मुंबई-बेंगलोर-अहिल्यानगर आणि संभाजीनगर या मुख्य शहरांना जोडणाऱ्या अंतर शहरी बससेवा देखील या मेट्रो स्थानकाशी जोडल्या जाणार आहेत. यात एकुण 13 स्थानकांचा समावेश असणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प आगामी 4 वर्षात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च 3,626.24 कोटी असणार आहे. एकुणच या नव्या मार्गामुळे पौड रोड व वाघोलीतील वाहतुककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.








