जुनी माणसं, माणसं जपायची, तेंव्हा शब्दाला किंमत होती, माणूसकीची जाण होती, भावनांची कदर होती आणि सर्वात महत्वाचं एकमेकांवर प्रचंड विश्वास होता, म्हणूनचं तेंव्हाचं जग फक्त शब्दावर चालायचं, कुणीही कुणावर सहज विश्वास ठेवायचं. माणूस माणसांचा सहज आधार बनायचा, पण काळाबरोबरच माणसं बदलली, आजच्या आधुनिक जमान्यात माणूसकी बोथट झालीय, मैत्री फक्त स्वार्थापूरती उरलीय,कामापूरती माणसं जवळ येतात, काम झालं की, मैत्री विसरुन जातात. सारं काही फक्त आणि फक्त पैशांसाठी, आजच्या युगात पैसा सर्वश्रेष्ठ ठरतोय, तुमच्याजवळ पैसा नाही तर तुम्ही शुन्य आहात ही आता जगाची रित बनलीय, पैशासमोर दुनिया झुकतीय, शेवटी पैशाचीचं ताकद इथे श्रेष्ठ ठरतीय, म्हणूनचं माणूसकी बिनूसकी असे शब्द आता फक्त इतिहास जमा झाले आहेत. विश्वासराव तर पाणीपतच्या युध्दातचं मारला गेलाय. त्यामुळे समाजात आपलेपणाने आणि आपुलकीने वागणाऱ्या माणसाच्या नशीबी सध्या फक्त आणि फक्त पश्चाताप दिसून येतो आहे. स्वार्थापोटी माणसं जवळ येतात, वरवर गोड बोलतात आणि काम झालं की आपल्याचं जीवावर मोठे होत आपल्याचं पाठीत खंजीर खुपसतात अशी सध्याची भीषण वास्तवता आहे, म्हणूनचं खोटेपणाच्या या जगात खरेपणा आता हरवत चाललाय. माणूसकी बोथट होत चाललीय, इथे भावनांना किंमत उरली नाही, पैशाच्या तालावर दुनिया नाचते आहे, म्हणूनचं उलट खरेपणाने जगणाऱ्या माणसाला इथे मोठी किंमत मोजावी लागते आहे. असं असलं तरी शेवटी खोटेपणावर नेहमीच खरेपणाने मात केली आहे हा इतिहास आहे. आज खोट बोलून नक्कीचं मोठा फायदा मिळवता येत असेलही, पण मानसिक सुख आणि समाधान कधीही मिळणार नाही. आज आपण छान जगतोय कारण आपली नितिमत्ता साफ आहे. रात्री शांत झोप लागते कारण आपण निर्मळ आहोत, पण एक मात्र नक्की चेहऱ्यावर मुखवटा चढवून फार काळ खोटेपणा टिकवता येत नाही, एक ना एक दिवस नियती धडा शिकवतेच, म्हणूनचं छान जगा,छान वागा,एकमेकांना आधार द्या, एकमेकांच्या सुख दु:खात वाटेकरी होण्यातचं खरं सुख आहे, यापेक्षा आणखी दुसरा आनंद जगात काय असू शकतो, पैसा महत्वाचा आहेच,पण पैसा सर्वस्व नाही एवढे मात्र निश्चत !








