शिरुर : शिरुर तालुक्यातील उरळगांव येथून 1 लाख 51 हजार रुपये किंमतीच्या डाळींबाची चोरी चक्क बागेतून झाली आहे. उरळगांव पाठोपाठ आता धामारीतही अशाच प्रकारची डाळींबाची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमधुन भीतीचे वातावरण पसरले आहे. उरळगांवच्या चोरी संदर्भात शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे (आफळेवस्ती,उरळगांव) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे.
मोठ्या मेहनतीने या शेतकऱ्याने ही डाळींबाची बाग फुलवली होती. यात एकुण 1512 किलो डाळींबाचे पिक भरास आले होते, किंबहुना ते विक्रीसाठी तयार झाले होते. या डाळींबाचा आजचा बाजारभाव अंदाजे 100 रुपये प्रति किलो दराप्रमाणे आहे तर याची एकुण किंमत 1 लाख 52 हजार 200 एवढी होते. आपल्या कष्टाच्या शेतीमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे आफळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोते पुढील तपास करीत आहेत.








