शिक्रापूरमधील दशक्रीया विधीमध्ये राजकीय भाषणांची नेहमीच स्पर्धा सुरु असते, मयत व्यक्तीच्या कुटुंबाचे दु:ख विसरुन विनाकारण राजकीय कुरघोड्यांना वेग आला होता. ही बाब नक्कीच निंदयीय होती. हीच बाब विचारात घेवून शिक्रापूर मधील तरुणांनी पुढाकार घेत या भाषणांवर आता लगाम घालण्याचा निर्णय घेवून दशक्रीया विधीच्या वेळी राजकीय भाषणांवर बंदी घालण्याचा फलक लावून एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याने संपूर्ण तालुक्यातून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
दशक्रीया घाट हे राजकीय व्यासपीठ नाही, किंवा राजकीय सभा नाही म्हणून गावातील एक आणि पाहुण्यांपैकी एक अशा फक्त दोनच व्यक्तींनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त करावे असा नियम लागू करण्यात आला आहे. तरुणांनी केवळ असा फलक लावून न थांबता या विषयावर आता लवकरच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अधिकृत ठरावही मांडण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
त्यामुळे दशक्रीया विधीमधील गांभीर्य राखण्यास मोठी मदत होणार आहे, या निर्णयामुळे नातेवाईकांचे सांत्वन करण्याचा मुळ उद्देश प्राप्त होणार असून अनावश्यक वेळही वाचणार आहे. दशक्रीया विधी हा काही वेळासाठी असणारा विधी परंतु राजकीय व्यासपीठासारखा तो तासनतास सुरु असल्याने मयत व्यक्तींच्या कुटुंबांचीही मोठी अवहेलना होत होती, त्यामुळे शिक्रापूरच्या तरुणांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतुन स्वागत व कौतुक होत आहे.








