शिरुर शहरातील विविध भागात भटक्या श्वानांची संख्या प्रचंड वाढल्याने सध्या गल्लोगल्ली टोळीने श्वासांची संख्या आढळून येत असल्याने आधीच यांची मोठी दहशत पसरलेली असताना आता वारंवार मुलांवर वा मोठ्या व्यक्तींवर सातत्याने होणाऱ्या श्वानांच्या हल्ल्यांमुळे आता नागरीकांना रस्त्याने फिरणेही मुश्कील होवून बसले आहे. अनेक लहान मुलांसह मोठ्या नागरीकांना ठिकठिकाणी अचानक हल्ले करुन चावा घेतल्याच्या घटना घडल्याने शिरुरमध्ये श्वानांबाबतीत दहशतीचे वातावरण पसरले आहे, एकुणच भटक्या श्वानांची दहशत वाढतेय, नागरीकांना हानीकारक ठरतेय, हल्ले वाढल्याने रस्त्याने फिरणेही आता मुश्कील होतेय अशीच काहीशी अवस्था आता शिरुरकरांची झाली आहे, त्यामुळे शिरुर नगरपरिषदेने तातडीने अशा हिंस्त्र श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांमधुन जोर धरत आहे.
नुकतेच शिरुर शहरातील अंडेबाजार येथे तीन ते चार श्वानांच्या टोळक्याने अठरा महिन्यांच्या मुलावर हल्ला करुन त्याचे लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेपासून नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे सर्व स्तरातून भटक्या श्वानांबाबत संतापाची लाट उसळली आहे.
या संदर्भात शिरुरमधील काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवून या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वीही वेळोवेळी केली आहे. मध्यंतरी शिरुर नगरपरिषदेने त्या त्या विभागातील श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करुन त्यांना रेबीज लसही देण्यात आली होती. मात्र त्यांना पुन्हा आहे त्याच जागी सोडण्यात आले, त्यांची संख्या मर्यादित राहण्याऐवजी ती अचानक वाढत चालल्याने नागरीकांमधुन या निर्बीजीकरणाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शिरुर शहर नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून भटक्या श्वानांची हीच स्थिती आहे. पूव भटक्या श्वानांना अन्न सहज उपलब्ध होत होते, सध्या मात्र श्वानांना पूरेसे अन्न न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील ग्लुकोज पातळी कमी होणे, त्यामुळे त्यांच्यात चिडचिड,सयम कमी होणे, अचानक हल्ला करण्याची शक्यता वाढणे या बाबी आढळून येतात, तसेच भूक आणि तणावामुळे त्यांच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. सतत रस्त्त्यावर पडलेले तेलकट व अस्वच्छ अन्न खाल्ल्यानेही त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होत असतात त्यामुळे श्वानांमध्ये अचानक हल्ला करण्याची प्रवृत्ती वाढते असेही मत व्यक्त केले जात आहे. त्यांच्या प्रजनन काळातही ते आक्रमक होतात असेही बोलले जाते.








