आयुष्य जगत असताना आपण मोठ्या अपेक्षेने भविष्याच्या दृष्टीने मोठे निर्णय घेत असतो, त्यावेळी तो निर्णय स्वत:चा असतो, त्यामुळे त्यातून जे काही चागले वाईट घडणार आहे याला आपण स्वत: जबाबदार असतो, तरीही आपण अनेकदा आपल्या नशीबाला दोष देतो, कधी परिस्थितीला कारणीभूत ठरवतो, पण तेच चांगलं झालं की हा माझा निर्णय सर्वात योग्य ठरला असे म्हणत आपण नकळत स्वत:ची पाठही थोपटून घेतो, परंतु परिस्थिती प्रतिकुल निर्माण झाली की मग डगमगतो, आपण कुठे चुकलो याचा विचार करीत बसतो, किंबहुना आपण अनेकदा डिप्रेशनचे शिकार होवून बसतो, बहुतांशवेळा आपल्या अडचणी आणि अडथळे आपण कुणासमोरही मोकळेपणाने बोलू शकत नाही, व्यक्त न झाल्यामुळेच आपण अधिक खचतो आणि मग निराशा पदरात घेवूनच वावरतो. वास्तविक आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन योग्य मार्ग काढणे आपल्या हातात असते, परंतु आपल्यातील मानसिक खच्चीकरणामुळे आपण योग्य निर्णय घेऊन अडथळे दूर करु शकत नाही, म्हणूनचं आपल्या अडचणी आपल्या आहेत, त्यावर आपणचं मार्ग शोधायला हवा, कारण एकटेपणात सावरणं आपल्या हाती असतं, दु:ख हलकं करायला कुणीचं जवळ नसतं, म्हणूनचं जगा असं की, स्वत:लाही गर्व होईल, करा स्वत:शीच मैत्री सुख वाट्याला येईल, कारण दु:ख वाटत बसलं की दु:खचं वाट्याला येतं आणि दु:खांत असूनही बाहेर पडत असताना आनंद शोधत राहीलं की मन कधीचं खचत नाही, उलट प्रसन्न मनाने बाहेर पडण्याचे योग्य मार्ग आपोआप समोर येत जातात, म्हणूनचं अडथळ्यांची शर्यत पार करताना आत्मविश्वासाचा डोंगर ढासळू देवू नका, नक्कीच यशस्वी व्हाल ! आनंदी रहाल !







