आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या युगात आपण नॉनस्टॉप धावत असताना आपलं आयुष्य अधिक सुखकर व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी परफेक्ट नियोजन करतो, या नियोजनात प्रत्येक कुटुंबात महिन्याचं विशिष्ट बजेट ठरतं, हे बजेट त्या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असत, जोतो आपापल्या परीनं चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला हव्या त्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा म्हणून किराणाची भलीमोठी यादी तयार करतो, यात न चुकता आपण आपल्या आवडीच्या पदार्थांचा किंवा वस्तूंचा समावेश करतो. यात दुधाचा महिन्याचा खर्च, किराणाचा खर्च, महिन्याला होणारा शालेय खर्च, घरभाडे, गाडीसाठी लागणारे पेट्रोल, डिझेल, त्या-त्या महिन्यात ऐनवेळी समोर येणारे खर्च या सर्व खर्चांचा आवर्जून समावेश करतो, पण आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे शरीर याकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष करतो, आजारी पडल्यानंतर आपल्या खर्चाच्या यादीत याबाबत कोणतीही तरतूद आपण केलेली नसते ही प्रत्येक कुटुंबात अगदी स्वाभाविकपणे अनुभवायला मिळणारी गोष्ट आहे, मग ते कुटुंब श्रीमंत असो वा गरीब, आपण कधीचं आपल्या आरोग्याला प्राधान्य देत नाही, मात्र ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मात्र आपल्याकडे उपचारासाठी पूरेशा पैशांची तरतूद नसते, किंबहुना काहींकडे काहीच व्यवस्था नसते. यामुळे मग ऐनवेळी पैशांसाठी जुळवाजुळव करण्याची प्रचंड धावपळ होते, त्यावेळी एकाबाजूला दु:खाचा डोंगर समोर असतो तर दुसऱ्या बाजूला पैशांची जुळवाजुळव करण्याची कसरत, अशावेळी कुणीही मदतीला येत नाही, म्हणूनचं आयुष्याच्या प्रवासात आपल्या आरोग्यावरील खर्चाची तरतूदही आता आपण आपल्या यादीत करणे गरजेचे आहे. कोणत्याही कंपनीचा का होईना पण कमीत कमी बजेटमधला एखादा हेल्थ इन्शुरन्स आपण काढायलाचं हवा, ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीची जाहीरात नाही, पण आपल्या आरोग्याबाबत आपण सजग असलं पाहीजे यासाठीची महत्वाची सुचना आहे. सध्या मार्केटमध्ये असंख्य हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत, ज्यात 16 हजारांपासून ते 50 हजारांपर्यंत वार्षिक प्रिमियम भरुन आपण भविष्यात आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यातून बाहेर पडू शकतो. ज्यामुळे कुटंबालाचे टेंन्शनही वाढणार नाही तसेच उपचारही विना अडथळा पार पडेल, म्हणून आपल्या यादीत आता आरोग्यालाही स्थान असायला हवं !








