संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

महायुतीचा घोळ,बसेना मेळ, सुरु आहे नुसता चढाओढींचा खेळ, सत्तेच्या सारीपाटात, वेगळीच खेळी,लागेना कुणाला कुणाचा ताळमेळ

SHARE:

ज्या पक्षाच्या विरोधात आपण आयुष्यभर लढलो, ज्या पक्षाशी प्रामाणिक राहून समोरच्या पक्षाला वेळोवेळी शह दिला त्याच पक्षांच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालून हातात हात देत आता महायुती झाल्याने कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची मात्र मोठी गोची झाल्याचे चित्र सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. अन्याय झाला आहे सांगायला आता वावचं उरला नाही. तिकडे गेल्यावर तिकडे मिळेल आणि इकडे राहील्यावर राजकीय करीअर घडेल याचीही गॅरंटी आता उरलेली नसल्याने सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिकनेते आणि पदाधिकारी आता मोठ्या संकटात सापडले आहेत, आपले राजकीय करीअर नेमके कसे ठरवावे ? याचा मार्गच आता दिशाहीन झाल्याने एक प्रकारची अस्वस्थता आता सर्वच पक्षात अनुभवायला मिळत आहे. महायुती नव्हती तोपर्यंत दबावतंत्र वापरुन तिकीट सहजपणे पदरात पाडून घेता येत होते, पण आता राजकीय तडजोडीत हक्काची जागा आपल्याचं मित्रपक्षाला जात असल्याने बंडखोरी करुन लढायचे तरी कसे? हा पेच सर्वांच्याच समोर निर्माण झाला आहे. तर आपला प्रभाव कायम राखण्यासाठी सध्या स्थानिक नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची केविलवाणी धडपड अनुभवायला मिळत आहे, यामुळे साहजिकच महायुतीचा घोळ, बसेना मेळ,सुरु आहे नुसता चढाओढींचा खेळ,सत्तेच्या सारीपाटात, वेगळीचं खेळी, लागेना कुणाचा कुणाला ताळमेळ अशीच अवस्था सर्वच पक्षात अनुभवायाला मिळत असल्याने एक विचित्र राजकीय अस्वस्थता सर्व स्तरातून समोर येत आहे.
वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभेचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला असता आताची स्थिती वगळता अनेक वर्षे शिरुर लोकसभेचा गड माजी खासदार शिवाजीराव आढळरावांच्या रुपाने शिवसेनेने नेहमीच अबाधीत राखला होता, परंतु महायुतीच्या घोळात अखेर आढळरावांचा राजकीय बळी गेला आणि डॉ. अमोल कोल्हेंच्या गळ्यात शेवटी खासदारकीची माळ पडली. 2009 पासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर घड्याळाविरोधात लढत होते,त्यावेळी त्यांनी तर चक्क शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही त्यांच्या विरोधात लढण्याचे आव्हान दिले होते तेच आढळराव पाटील राष्ट्रवादीत आले आणि त्याच घडाळ्याच्या चिन्हावर राष्ट्रवादीच्याच विरोधात लढले, याचाच फटका त्यांना बसला आणि पराभवाला सामोरे जावे लागले.
विधानसभेच्या रणांगणातही 1999 पासून अर्थातच तब्बल 25 वर्षे राष्ट्रवादीच्या घड्याळा विरुध्द भाजपाचे कमळ नेहमीच अशीच लढत होत राहीली आहे, आता याच घड्याळाने कमळाशी मैत्री केल्याने आपल्या राजकीय श्रेष्ठत्वासाठी किंवा करीअरसाठी राजकीय छुप्या खेळीला प्राधान्य दिले जात आहे. आयुष्यभर घड्याळ विरुध्द भाजप अशी लढत होत असताना आता कार्यकर्त्यांना भाजपाचा अर्थातच महायुतीचा आदेश पाळावा लागत आहे. इथे मात्र कार्यकर्ते स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गोची होताना दिसत आहे, ज्यांच्याशी कधीच पटले नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना सर्वांचीच कुचंबना होताना दिसून येत आहे, राज्यात भाजपा मोठा पक्ष असला तरी शिरुर-हवेलीत राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्यामुळे आपला पक्ष मोठा व्हावा, आपल्यालाचं संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे, मात्र दुसरीकडे भाजपा मोठा भाऊ असल्याने आपलाच विचार व्हावा असही एक मतप्रवाह पक्षात दिसून येत आहे, या विचित्र स्पर्धेमुळेच महायुतीची मोठी ताकद असूनही सर्वच पक्षांना त्याचा मोठा फटका बसताना दिसून येत आहे एवढे मात्र निश्चित !

एका पक्षात सुर जुळले नाही तर कार्यकर्ता आणि स्थानिक नेते अन्याय झाला म्हणून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास सुखकर होतो असा अनेकांचा अनुभव आहे. विशिष्ट पक्षात आपले वजन प्राप्त झाल्यानंतर आपल्या कामाची योग्य दखल घेऊ न आपल्या हक्काची उमेदवारी मिळावी अशी स्थानिक नेत्यांची भावना असते, त्यामुळे जिथे अन्याय होतो तिथे पक्षांतर होणे साहजिकच आहे, परंतु भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना अशी युती झाल्याने स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे, अन्याय झाला आहे असे सांगायला आता वावचं उरला नाही, कारण ज्या पक्षात आपण जावू शकतो त्याच पक्षाशी त्याच्या पक्षाची युती झाल्याने सर्वांचीच मोठी कोंडी झाली आहे

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment