कार्यकर्ता सक्षम झाला तरचं पक्ष मजबूत होईल ही निती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या काळात अवंलबली म्हणूनच कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहताना त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांनीही नेहमीचं पवारांना प्रचंड पाठबळ दिले, आपली भावना जाणणाऱ्या आणि आपली जाणीव ठेवणाऱ्या या नेत्याशी त्यामुळेच त्यांच्या सच्च्या कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा कायम राखली, यामुळेचं आपल्या राजकीय कारकिदचा प्रवास मोठ्या गतीने पवार साहेबांना पुढे नेता आला,हा राजकीय इतिहास आहे, तो पुसता येणार नाही, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी मंत्री स्व.बापूसाहेब थिटे, माजी आमदार सुर्यकांतजी पलांडे यांच्यासारखे कार्यकर्ते घडविताना विविध संस्था उभारण्यासाठी या नेत्यांना पवार साहेबांनी प्रचंड पाठबळ दिले म्हणूनचं हे नेते त्या काळात गेली अनेक वर्षे आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरले होते. आजही त्या त्या भागावर या नेत्यांची पकड कायम आहे, म्हणूनचं पवारांची हीच निती राजकारणात यशस्वी होण्यासाठी आता प्रत्येकाने अवलंबणे गरजेचे आहे, आजच्या परिस्थितीत ती काळाची गरज आहे, एकुणच आता गरज आहे नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याची, होईल नक्कीचं विकास, नको नुसता आभास, आता गरज आहे प्रॅक्टीकल होण्याची !
वास्तविक पाहता सहकार कॉंग्रेसने रुजवला परंतु आपल्या राजकीय कौशल्याच्या बळावर पवार साहेबांनी तो पुढे नेला, स्थानिक नेत्यांना विविध संस्था उभारणीसाठी, सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत, खासगी शैक्षणिक संस्था उभारणीत, दूधसंस्थांच्या उभारणीत, सोसायट्यांच्या विकासासाठी अशा विविध कारणांनी नेहमीच त्या त्या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचंड मोठे पाठबळ दिले, यातूनच कार्यकर्ता सक्षम होत गेला, खासगी संस्थांच्या माध्यमातून पैशाचा मोठा ओघ कार्यकर्त्यांकडे वाढला, स्वत:च्या व्यवसायाच्या विस्तारासाठीही मग स्थानिक नेत्यांना बळ मिळत गेले, यातूनचं स्थानिक नेता अर्थातच पवार साहेबांचा खंदा कार्यकर्ता पुढे प्रसिध्द उद्योजक बनला, आर्थिक सक्षमतेमुळे पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी निवडणुकांसाठी तो खर्च करु लागला, अशाच पध्दतीने पुढे पुढे पवारांचा पक्ष वाढत राहीला, कार्यकर्त्याला स्थैर्य लाभल्यामुळे कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्यावरची निष्ठा कायम ठेवली, हा इतिहास आहे. आजही पवार साहेबांनी ज्या ज्या नेत्यांना सक्षमपणे उभे केले आहे ते आजही साहेबांसोबत आहेत. हा राजकीय इतिहास डोळ्यासमोर ठेवला असता, नेता सर्वसमावेशक असावा, कार्यकर्त्यांना बळ देणारा, कार्यकर्त्यांना घडविणारा, कार्यकर्त्यांच्या आणि परिसराच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणारा नेता असला की पक्ष आपोआपच सक्षम होत जातो, वास्तविक पाहता कोरोनानंतर सामाजिक समतोल प्रचंड ढासळला आहे, अनेकांची आर्थिक़ बाजू कमकुवत बनली आहे, दुसऱ्याच्या व्यथा जाणणारा कार्यकर्ता आता स्वत:च अडचणीत आला आहे, खर्चाचा कोणताच भार तो सध्या पेलवू शकत नाही ही स्थिती अनेकांच्या बाबतीत दिसून येते, परंतु पद आणि प्रतिष्ठेमुळे कार्यकर्ता आपली बाजू मांडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, मात्र अशा निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक स्थानिक नेत्याने पुढाकार घेवून त्याला आर्थिक सक्षम बनविण्यासाठी पाठबळ दिले, चार कामे मिळवून दिली, बॅंकांच्या कर्जांसाठी पाठबळ देवून त्याला व्यवसायीक दृष्ट्या सक्षम बनवलं तर मग हेच कार्यकर्ते नक्कीचं आपल्या नेत्याची जाण ठेवतील. छोट्या छोट्या कार्यक्रमांचा मोठा भार ते सहज उचलू शकतील, यातूनचं नक्कीचं पक्ष त्या त्या भागात मजबूत होत राहीलं आणि कार्यकर्ता उद्योजक बनला, सक्षम झाला तर तोच आपल्या कार्यकर्त्यांसाठी मोठा रोजगार उपलब्ध करुन देऊ शकेल यात शंकाच नाही. म्हणूनचं असा व्यापक विचार राजकारणात व्हायलाचं हवा. यातच सर्व पक्षांचं हीत आहे एवढे मात्र निश्चित !
कार्यकर्ता सक्षम झाला तरचं पक्ष मजबूत होईल हा विचार करताना कार्यकर्ता आर्थिक दृष्टया मजबूत झाला तर आपल्याला डोईजड होईल असा नकारात्मक विचार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार साहेबांनी कधीचं केला नाही, उलट ते त्याला नेहमीच पाठबळ देत राहीले, म्हणूनचं गांवा-गांवातून आजही प्रमाणिक कार्यकर्त्यांची सक्षम फळी पवार साहेबांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहताना दिसून येते. आपल्याला स्पर्धक नको म्हणून सक्षम कार्यकर्ते न तयार होऊ देणारे स्थानिक नेते अनेकदा फक्त स्वत:चे हित साधताना, यातूनचं राजकारणात मग दुफळी तयार होते आणि मोठा फटका पक्षाला बसतो हाही इतिहास आहे.








