पूर्वीच्या काळी फक्त जनहितासाठीचं राजकारण असायचं, राजकारणात पैशाची ताकद फारशी चालत नव्हती, उमेदवार सायकल वा दुचाकी वरुन प्रचार करायचे तर गावातील लोक लोकवर्गणी उभी करुन लोकप्रिय उमेदवारासाठी जुजबी खर्च उभा करायचे, कारण तेंव्हा प्रचार खर्चही फारसा नव्हता आणि गावातील किंवा त्या त्या भागातील लोकही चांगला माणूस निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होईल अशी त्यांची भावना असायची, किंबहुना निवडून आलेला नेताही गावकऱ्यांच्या या सद्भावनेची जाणीव ठेवून आपल्या भागाच्या विकासासाठी तेवढे योगदानही द्यायचा, पण आजच्या आधुनिक युगात राजकारणाचा र्ट्रेंडच पूर्णपणे बदलतोय, राजकीय पक्षांची संख्या वाढल्याने, नेत्यांची संख्याही वाढलीय, त्यामुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलीय, प्रत्येक पक्षाने काळानुरुप आपापली पॉलिटीकलस्टॅटीजी बदलल्याने फक्त निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तींनाच उमेदवारी हा अजेंडा सातत्याने समोर ठेवल्यानेे आता राजकीय समीकरणेही वेगाने बदलत आहेत. त्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा पॉलिटीक्सचा नवीन पायंडा आता समोर येत असल्याने समाजातूनही याबाबतीत चिंता व्यक्त होताना दिसून येत आहे.
लोकांना समाजासाठी झटणारा, आपल्या भागासाठी अहोरात्र काम करणारा, विकासकामांसाठी सतत पुढाकार घेणारा, सहज भेटणारा, त्यांच्या भागातील समस्यांना प्राधान्य देणारा नेता हवा असतो, परंतु दुर्दैंवाने काही राजकीय नेत्यांमध्ये सध्या काही अपवाद वगळता इतकी परिपूर्णता दिसून येत नाही, ज्यांच्याकडे फक्त पैसा आहे, त्यांच्याकडे नक्कीच राजकीय कौशल्य , प्रभावी जनमत असतेच असे नाही, फक्त आर्थिक ताकद आहे, समाज त्याला मोठा मानतो, त्याच्याकडे मजबूत आर्थिक ताकद आहे ज्या बळावर तो सहज मते विकत घेवू शकतो म्हणूनही कधी कधी राजकीय रणनितीचा भाग म्हणुन अशांना उमेदवारी दिली जाते, शेवटी जेंव्हा निवडणुक कठीण जाते त्यावेळी सर्वसामान्य उमेदवार प्रभावी असूनही केवळ आर्थिक ताकदीत कमी पडतो आणि शेवटी ज्याच्याकडे आर्थिक पाठबळ आहे तो त्याला हवे तेवढे मतदान सहजपणे विकत घेवून निवडून येतो, यामुळेचं आता चांगली माणसे राजकारणापासून दूर जाताना दिसत आहेत, पैसा असला की माणसाकडे साहजिकच ॲटीट्युड येतोच, हाच इगो त्या नेत्याच्या आड येतो, त्यामुळे अनेकदा नेता आणि जनतेत संघर्ष निर्माण होतो, मग जनतेचा लोकशाही वरचा विश्वास उडत जातो आणि मग सुरु होतो संघर्षाचा प्रवास.
जेंव्हा एखादा नेता पैशाच्या बळावर बहुमताने निवडून येतो, तेंव्हा त्याला वाटतं आपण सगळंचं पैशाने विकत घेवू शकतो, त्यामुळे त्यांच्यातील हाच इगो सहजपणे कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना सतत दुखावत जातो, वास्तविक कार्यकर्ता हा प्र्रत्येक नेत्याचा कणा आहे, राजकीय पक्षही ही त्या नेत्याची ताकद असते, कार्यकर्ते असतील तर तुमच्याबद्दल चांगलं बोलणं, आपले विचार आणि कामं समाजा समोर ठेवणं, आपल्याला चांगलं प्रेझेंट करण, आपल्या नेत्याला लोकांसमोर प्रभावी ठरवण शक्य होतं, पक्षही त्या त्या नेत्याला प्रभावीपणे प्रमोट करीत असतो, त्याच्या कामांना गती देण्यासाठी अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी आग्रही असतो, म्हणूनचं स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पक्ष हा त्या त्या भागातील नेत्याच्या प्रगतीच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो, तरीही आजची आधुनिक नेत्यांची पिढी अनेक अपवाद वगळता कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि पक्षाचाही अनादर करताना अनेकदा दिसून येतात, म्हणूनचं जनतेमध्ये या आधुनिक राजकारणा बाबतीत प्रचंड निराशा दिसून येते. म्हणूनच लोक सहजपणे पैसे घेवून नेत्यांना निवडून देतात. नेतेही आपण पैशावर निवडून आलोय याचे भान विसरुन आपल्या आर्थिक ताकदीच्या बळावर आपल्याला प्रतिस्पर्धी ठरतील अशांना खच्चीकरण्यासाठी पुढाकार घेतात, यातूनच त्या नेत्याचा, पक्षाच्या प्रतिमेचा प्रभाव कमी कमी होत जातो, सध्याची नवीन पिढी मात्र प्रचंड शार्प आहे, त्यामुळे अशी परिस्थिती कायम राहील असेही नाही, त्यामुळे साहजिकच जरी राजकीय ट्रेंड बदलतोय पण मनमानी टिकत नाही, जपला कार्यकर्ता, जोपासली माणसं तरच मिळते लोकप्रियता,केवळ आर्थिक सामर्थ्यावर कधीच कायमचं यश मिळत नाही, त्यामुळे जे नेते असं वागत असतील त्यांनी आपली राजकीय नीती बदलायला हवी तरच आपल्याला मिळालेलं यश त्यांना नक्कीच टिकवता येईल, आपला प्रभावही कायम राखता येईल एवढे मात्र निश्चत !
राजकारणात जनतेच्या प्रश्नांबरोबर प्रभाव असणे गरजेचा !
राजकारणात यश मिळवायचं असेल तर जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासकामांना गती ही द्यावीच लागते, त्याचबरोबर माणसं जोडणंही महत्वाचं असतं. प्रत्येक वेळी आर्थिक ताकदीवर यश मिळेलचं असे नाही.तसे असते तर प्रत्येक आर्थिक क्षमता असणाऱ्यांनी सहज सत्ता मिळवली असती, परंतु जनमाणसातला नेता होण्यासाठी कार्यकर्त्यांचे पाठबळ, प्रचंड जनसंपर्क, प्रभावी नेतृत्व हे गुणहीअसावेच लागतात.सध्या मात्र आर्थिक ताकदीचा ट्रेंड आल्याने आपण कुणालाही सहज खरेदी करु शकतो, अशी भावना निर्माण होत असल्याने राजकारणाला एक वेगळी दिशा मिळताना दिसत आहे.








