संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

अशी आहे दसरा सणाची परंपरा आणि महती, करुया दुर्गुणांचा नाश,घेऊ यात चांगल्याची प्रचिती

SHARE:

॥ आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिहांसनी हो ॥
॥ प्रतिपदेपासून घटस्थपाना ती करूनही हो ॥
अशी ही माता अंबाबाई 9 दिवस सर्वांच्या घरी विराजमान झालीये…. घटस्थापना करून देवीचे नवरात्र साजरे केले जातात. घटाच्या दहाव्या दिवशी येते ती विजयादशमी म्हणजेच दसरा. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असं उगीचचं म्हटलं जात नाही.या काव्यातच सणाची महती गौरवलेली आहे. हिंदू संस्कृतीत दसऱ्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वत्रच उत्साहाचं आणि आनंदाच वातावरण असत. दसरा म्हणजे विजयाचं प्रतिक, दसरा म्हणजे पराक्रमाचा सण,अज्ञानावर ज्ञानाने, शत्रुवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवण्याचा सुंदर दिवसं. दसरा म्हणजे साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो. दसरा साजरा करण्याची प्रथा फार प्राचीन आहे. याच दिवशी देवीनं महिषासुराचा वध केला होता. प्रभु रामचंद्रांनीही याच दिवशी रावणाचा वध केला होता. द्वापरयुगात पांडवांनी अज्ञातवास संपताच याच दिवशी शक्तीपूजन करून क्षमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे परत घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी
प्रतापगडावर भवानी देवीच्या उत्सवाला सुरवात केली ते याच दिवशी. पेशवे आणि इतर राजेसुद्धा याच दिवशी स्वारिचे बेत आखायचे. त्याचप्रमाणे समाजातही दसरा कोणत्याही नवीन कार्यांसाठी शुभ मानला जातो. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर नव्या योजना, नवी खरेदी, नवे करार, सोने-चांदीची खरेदी, नवे व्यवसाय अशा विविध कारणांसाठी हा मूहूर्त साधला जातो. दसऱ्याच्या दिवशी झेंडुच्या फुलांना फार महत्त्व असतं. या दिवशी घरोघरी गोडाचा नैवेद्य केला जातो. यादिवशी पराक्रमाचे प्रतिक म्हणून योद्धे शस्त्रांची तर, शेतकरी आपल्या शेतीत सहाय्य करणाऱ्या अवजारांची पूजा करतात आणि ज्ञानाची देवी म्हणून सरस्वतीची आवर्जून पुजा केली जाते. तसंच एकमेकांना आपट्याची पानं देऊन थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेतले जातात.भारतीय संस्कृतीत आपट्याच्या पानाला सोन्याचं मोलं का आहे? याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते.फार वर्षांपुव वरतंतू नावाचे ऋषी होते. कौत्स नावाचा त्यांचा शिष्य होता. त्याला ऋषींना चौदा विद्याच्या बदल्यात गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या.कौत्स या सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरीता रघुराजाकडे गेला आणि चौदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. रघुराजा यासाठी इंद्रावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. इंद्रानं कुबेराला आपटा आणि क्षमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव करण्यास सांगितलं. कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि ऋषींना गुरुदक्षिणा दिल्यावर उरलेल्या सुवर्ण मुद्रांचे आपटयाच्या झाडाखाली ढिग रचले. सामान्य नगरवासियांना हव्या तेवढया मुद्रा घेऊन जाण्याची विनंती केली. तो दिवस होता विजयादशमीचा. नगरवासियांनी आपटयाच्या झाडाची पुजा करून हव तेवढ सोन लुटलं. तेव्हांपासुन आपटयाच्या पानांना सुवर्णमुद्रांचं मोल प्राप्त झालं, आजही दसऱ्याला सोन्याची पान म्हणून आपट्याची पानं देण्याची प्रथा आहे. किंबहुना आपटयाची पानं कफ व पित्त दोषांवर गुणकारी असल्याचही म्हटलं जात.दसरा सण शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करतात. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करून दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात.कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात..घरात धन-धान्यांची भरभराट असावी ही यामागची भावना आहे. श्रावण महिना सुरु होताच रक्षाबंधनापासून सुरु झालेल्या सणांच्या मालिकेत नवरात्रीनंतर चाहुल लागते ती दिवाळीची. साधुसंत येती घरा तोचि, दिवाळी दसरा या तुकाराम महाराजांच्या अभंग ओळीत या दोन सणांचा अजोड असा उल्लेख केलाय. तसंच देवीनं या नवरात्रीत जस नऊ वाईट शक्तिंचा नाश केला त्याचंच प्रतिक म्हणून आपणही या दसऱ्याच्या मुहुर्तावर आपल्यातल्या दुर्गुणांचा, वाईट विचारांचा नाश करण्याचा संकल्प करुयात आणि भारत बलवान आणि बलशाली होण्यासाठी खारीचा का होईना पण वाटा उचलुयात,
!! सोनं घ्या आणि सोन्यासारखे रहा !!

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment