अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिरुर-खेड-कर्जत महामार्गाला आता लवकरचं शासनाची मंजूरी मिळणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिल्याने आता शिरुर,खेड व कर्जत या महत्वाच्या तालुक्यांमधुन जाणाऱ्या वाहनांना चाकण-शिक्रापूर-तळेगांव मधुन प्रवास करताना या नव्याने होणाऱ्या महामार्गामुळे वाहतुक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गाला मल्टीनोडल कॉडीडॉर म्हणुन ओळखले जाणार आहे.
हा संपूर्ण प्रस्तावित महामार्ग चौपदरी असणार आहे. तर शिरुर-पाबळ-राजगुरुनगर-शिरोली मार्गे हा रस्ता पाईट-वांद्रे-कर्जत मार्गे पुढे पनवेल व उरणला जोडला जाणार आहे, यामुळे साहजिकच या रस्त्यावर पूव असणारा वाहतुकीचा ताण यामुळे विभागला जाईल तसेच औद्योगिक व कृषी क्षेत्राला या महामार्गामुळे मोठी चालना मिळणार आहे. शिवाय हा मार्ग अधिक गतीमान होणार आहे.
या रस्त्याची अंदाजे लांबी सुमारे 135 किलोमीटर असणार आहे. यासाठी भूसंपादन तसेच नव्याने रस्ते बांधणीसाठी सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
सुमारे 670 हेक्टर क्षेत्र यासाठी संपादित केले जाणार आहे. बीओटी तत्वावर या रस्त्याची उभारणी केली जाणार आहे. याची प्रस्तावित रचना समोर आली आहे यानुसार 5 बोगदे, एकुण 54 पूल यात सहा मोठे व अठ्ठेचाहीस लहान पूल असणार आहेत. अशीही माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.
सध्या पुणे-आहिल्यानगर महामार्गावर आता लवकरचं पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम गतीने सुरु होणार आहे, त्यात आता हा शिरुर-खेड-कर्जत असा मुंबईला जोडणारा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याने साहजिकचं मराठवाड्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या व पुण्यावरुन संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता या दोन्हीही गतीमान रत्यांचा मोठा फायदा होणार आहे. एकुणच पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर सातत्याने समोर येणारी वाहतुक कोंडी यामुळे नक्कीचं संपुष्टात येणार आहे, प्रतिक्षा फक्त एवढीच की या नव्या प्रस्तावित महामार्गाला लवकरात लवकर मंजूरी मिळून कामाला गती येणे गरजेचे आहे तसेच पुणे-संभाजीनगर रस्ताही वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे पुणे-अहिल्यानगर रस्ता अधिक गतीमान होईल यात शंकाच नाही.
– शिरुर-खेड-कर्जत प्रस्तावित महामार्ग 135 कि.मी.असणार, रस्ता चौपदरी होणार
– या महामार्गासाठी एकुण 670 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार
– प्रकल्पाची एकुण किंमत सुमारे 12 हजार कोटी असणार
– 5 बोगदे या संपूर्ण महामार्गावर असणार आहेत
– 54 पुलांचा या महामार्गावर समावेश करण्यात येणार आहे तर यात सहा मोठे व अठ्ठेचाळीस लहान पूल असणार आहेत.
– या नव्या महामार्गामुळे वाहतुक कोंडींचा प्रश्न माग लागणार आहे.








