आयुष्याच्या या वाटेवरुन चालताना कधीचं कुणाशी प्रतारणा केली नाही, कधी माणूसकी सोडून वागलो नाही, मी माझ्या कामाशी आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहात प्रत्येकाशी अगदी तळमळीने आणि मनापासून मैत्री निभावत गेलो, जवळ आलेल्या माणसांना मी आपलं मानत गेलो, तरीही समाजात वावरताना अनेकदा प्रचंड वाईट अनुभव आले, काहींमुळे प्रचंड मानसिक त्रास झाला, त्यामुळे कधी कधी वाटतं आता मन कठोर करावं आणि सडेतोड वागावं, मात्र अनेकदा मनाला समजावताना तसे वागण्याही प्रयत्न केला पण खरं सांगतो कधीचं तसं वागणं जमलं नाही, विशेष म्हणजे ठरवूनही तसं कधी मला वागता आलं नाही.
मी मेहनत करतो, मी प्रामाणिक प्रयत्न करतो, फायदा, तोटा जो काही आहे तो माझा होणार आहे, कुणी कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपलं काम करीत राहणं, दिलेला शब्द पाळणं आणि अहोरात्र मेहनत करणं या वृत्तीनेच मी चालत राहीलो, तरीही मी कुणाच्यातरी स्पर्धेत आहे, कदाचित कुणाच्यातरी वरचढ आहे म्हणून माझ्या समोर नेहमीच कुरघोड्या करणारी माणसेच येत राहीली
मनात अनेकदा प्रश्न पडला, मी या लोकांबद्दल कधीचं वाईट चिंतल नाही, कधीच त्यांच्या विरोधात गेलो नाही, त्यांच्या वाटेत कधीचं अडथळे निर्माण केले नाहीत तरीही अशी माणसं माझ्या वाटेत अनेकदा अडसर ठरत राहीली याची खंत मनाला नेहमीच बोचत राहीली.
एक गेला की दुसरा आणि दुसरा गेला की तिसरा कुरघोड्या करणाऱ्यांची मालिका संपतच नव्हती, यामुळेच मी अनेकदा खच्ची होत गेलो, पण माझ्या आतल्या मनानं मला नेहमीच उभारी दिली आणि पुढे जाण्याचं बळ दिलं. इथे एक खात्री मला पटली माणसं बदलणार नाहीत म्हणून आता आपणचं स्वत:ला बदलायचं असा मी मनाशी ठाम निर्धार केला आणि म्हणूनचं मी आता स्वत:लाचं बदलायचं ठरवलं आहे, कारण समोर येणारी माणसं जर बदलणार नसतील तर मग आपणचं स्वत:ला बदलावं, असा ध्यास घेवून मी माझी वाटचाल करीत राहीलो. अनुभवातून खुप काही शिकायला मिळालं, म्हणूनचं आता एखादा स्वार्थी आणि मतलबी माणूस समोर येताना हा नक्कीच पाठीत खंजीर खुपणार याची मला जाणीव होते, आणि मी अलर्ट मोडवर जातो, माझ्या अशा वागण्याचा जीवनात नक्कीच फायदा होत गेला, कारण मी स्वत:ला बदललं आहे.
माणूस हा भावनिक आहे आणि याचं भावनिकतेचा फायदा संधीसाधू उठवतात. आपुलकीचे नाटक करुन जवळ येणाऱ्या माणसांचा हेतू आपल्याला ठावुक नसतो. म्हणूनच काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्यालाही कोणत्याही स्थितीत खुप छान वावरता येतं. तो त्याचा स्वभाव आहे, हे आपण गृहीत धरुन चाललो तर मग आपल्यालाही त्रास होत नाही आणि वाटेत अडथळाही निर्माण होत नाही. म्हणूनचं मी आता माझ्या वाटेवरुन चालायचं ठरवलंय. मला माहिती आहे या वाटेत मी एकटाच आहे आणि एकटाचं राहणार आहे, म्हणूनचं मी आज सुखी आहे.








