संवाद वाहिनीचा पुढील अंक 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -12 ऑगस्ट 2026

E-20 पेट्रोलमुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकट होतेय, वाहनधारकांच्या मनात मात्र गाडी अनफीट होण्याची धास्ती भरतेय ! मात्र भारत ऊ र्जा स्वावलंबनाकडे झेप घेतोय, शेतकरी हीत जोपासले जातेय !!

SHARE:

खरचं ई-20 पेट्रोल वाहनांसाठी असुरक्षित आहे? या पेट्रोलने मायलेज कमी होते? इंजिनला हानी पोहोचते ? पेट्रोल पंपावर इंधन भरताना सहजपणे विचारला जाणारा हा प्रश्न आज कोट्यावधी वाहनचालकांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण करतो आहे. भारत सरकारने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, हे लक्ष्य 2025-2026 मध्येच पूर्ण करण्यात आले. सरकारच्या मते ई-20 पेट्रोलमुळे वायूप्रदूषणाला आळा बसेल.कच्च्या तेलावरील आयात कमी होईल आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल. दुसरीकडे, काही वाहनचालकांचा दावा आहे की ई-20 वापरल्यानंतर वाहनाचे मायलेज कमी होते, इंजिनवरही त्याचा विपरित परिणाम होतो अशीही चर्चा आहे, या चर्चेनेच वाहनधारकांच्या मनात धास्ती भरली आहे. मात्र सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले इथेनॉल नेमके आहे तरी काय?
साखरेचे किंवा स्टार्चचे फर्मंटेशन करून त्यानंतर त्याच्या डिस्टीलेशन प्रक्रियेतून शुद्ध इथेनॉल तयार केले जाते. ई-20 पेट्रोल म्हणजे 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण आहे.
इथेनॉल हे ऊस, मका, तुटलेले धान्य आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. मग प्रश्न असा आहे की जगातील असंख्य देशांमध्ये यशस्वी ठरलेले ई-20 पेट्रोल भारतातचं वादाचा मुद्दा का ठरत असावा? याचे मुख्य कारण भारतातील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊ न तयार होणाऱ्या वाहनांची रचना आणि इतर देशातील वाहनांची रचना यात प्रचंड मोठी तफावत आहे. वास्तविक ब्राझील आणि अमेरिका सरकारने इथेनॉलचा वापर वाढवताना वाहन उद्योगाला अनेक वर्षे तयारीसाठी वेळ दिला होता. त्या-त्या देशांतील वाहनांचे इंजिन, इंधन पाईप, रबर सील आणि इतर भाग इथेनॉलचा विचार करून विकसित केले होते. भारतात मात्र अजूनही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात 2023 पूर्वीची जुनी वाहने आहेत. यापैकी अनेक वाहने ई-20 पेट्रोलसाठी हवी तितकी सक्षम नाहीत. त्यामुळे काही वाहनांमध्ये मायलेज कमी होणे किंवा इंधन प्रणालीशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात असेही बोलले जात आहे. शिवाय भारतातील हवामान, वाहनांच्या देखभालीची पद्धत, इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांचे सरासरी वय हेही महत्त्वाचे घटक आहेत यामुळेही उलटसुलट चर्चांना चालना मिळते आहे.
सरकारने केलेल्या दाव्यानुसार ई-20 पेट्रोलचे अनेक फायदे आहेत. यात प्रामुख्याने कच्च्या तेलाची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत होते आहे. कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते आहे. ऊस आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ मिळू लागल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. भारत ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करतो आहे.
मात्र यात काही आव्हानेही समोर आहेत यात इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असल्याने काही वाहनांमध्ये मायलेज 3 ते 5 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते अशीही चर्चा आहे. जुन्या वाहनांमध्ये इंधन प्रणालीतील काही भागांवर परिणाम होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करताना दिसून येतात तसेच इथेनॉल उत्पादनासाठी ऊस लागवड वाढल्यास पाण्याच्या वापराबाबतही पर्यावरण तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. एकुणच ई-20 पेट्रोल हे केवळ इंधनासाठी नवा पर्याय नसून भारताच्या ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण, शेतकरीहीत आणि भारताची अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी योग्य पर्याय, या महत्वाच्या उद्दिष्टांना जोडणारे दमदार पाऊ ल आहे. मात्र, या धोरणाच्या यशासाठी वाहनचालकांमध्ये योग्य जनजागृती, वाहनांची तांत्रिक सुसंगतता आणि पारदर्शक माहिती देणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे ई-20 पेट्रोलकडे भीती किंवा अविश्वासाने नव्हे, तर वैज्ञानिक माहिती आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे एवढे मात्र निश्चित !

एका बाजूला पेट्रोलमध्ये20% इथेनॉलचा वापर केल्याने वाहनांना कोणतीही हानी पोहोचत नाही असा दावा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला इथेनॉलच्या मिश्रणाने गाड्यांना हानी पोहोचत आहे अशीही चर्चा जोर धरु लागल्याने वाहन धारक मात्र द्वीधा मन:स्थितीत आहेत.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment