शिरुर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता इच्छुकांची मोठी यादीच दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहे. परंतू माणिकचंद उद्योगसमुहाचे प्रमुख प्रकाशशेठ धारीवाल यांच्या समर्थकांमध्ये मात्र काहीसा नाराजीचा सुर दिसून येत आहे.ही जागा खुल्या प्रवर्गासाठी असती तर आदित्य प्रकाशशेठ धारीवाल यांच्या नावाला सर्वानुमते संमती मिळाली असती अशी धारीवाल समर्थकांची भावना होती, परंतु प्रत्यक्षात ही जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने धारीवालांची मोठी संधी आता पुन्हांदा हुकली आहे, त्यामुळे कही खुशी कही गम असाच एकुण माहोल सध्या शिरुर शहराच्या राजकारणात अनुभवायाला मिळत आहे. प्रकाशशेठ धारीवाल यांनी 9 ऑक्टोबर पासून आपल्या कोअर टीम सोबत बैठकांचे सत्र वेगाने सुरु केले आहे, मात्र अद्यापही त्यांनी या निवडणुकीत आपला स्वतंत्र पॅनेल असणार की नाही याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, तसेच भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस अजितदादा गट यांनीही आपला स्वतंत्र पॅनेल असणार की नाही याबाबत भूमिका समोर ठेवेलली नाही ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते आहे ती म्हणजे अनेकांकडे सध्या मराठा कुणबी प्रमाणपत्र असल्याने ओबीसी मधुन उभे राहण्यासाठी आता त्यांचाही मार्ग मोकळा झाल्याने शिरुर शहरातील राजकारणात आता मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र सध्यातरी समोर आहे. अद्यापही कोणत्याही नेत्यांची भूमिका शिरुर नगरपरिषद निवडणुकीच्या बाबतीत स्पष्टपणे समोर आलेली नसली तरी कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांनी मात्र आपण या निवडणुकीत बाजी मारणारचं किंवा आपल्या समर्थकांना भक्कमपणे पाठबळ देवून निवडून आणणारचं अशी ठाम भूमिका घेतल्याने शिरुरच्या
राजकारणात आता मोठा पेच निर्माण होणार आहे, त्यामुळे कुणाला रोखणार आणि कुणाला तिकीट देणार याबाबतची मोठी कसरत नेत्यांना करावी लागणार आहे. यंदाच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांची उणीव मात्र शिरुरकरांना नक्कीचं भासणार आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे जाहीर होताच या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी यादी समोर आली आहे यात शिरुर नगरपरिषदेच्या माजी उपगराध्यक्षा व एस.के.खांडरे ज्वेलर्सचे मालक शंतनुभैय्या खांडरे यांच्या मातोश्री अलकाताई सुरेश खांडरे, माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई राजेंद्र लोळगे, क्रिशा होंडाचे प्रमुख किरण पठारे यांच्या पत्नी प्रज्ञाताई किरण पठारे, श्री संत शिरोमणी सावता महाराज समर्थ युवा प्रतिष्ठान शिरुरचे संस्थापक अध्यक्ष किरण बनकर यांच्या पत्नी तसेच माजी नगरसेविका रोहिणीताई किरण बनकर, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख मयुर थोरात यांच्या पत्नी तसेच माजी नगरसेविका अंजलीताई मयुर थोरात, माजी नगरसेवक विठ्ठल पवार यांच्या पत्नी रोहीणीताई पवार, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्या पत्नी ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, जिजामाता महिला सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षा व माजी नगरसेविका सुरेखाताई संतोष शितोळे आदि इच्छुकांची मोठी यादी सध्या समोर आहे. यावेळी अहोंची संधी हुकल्यानमुळे आता पत्नींची नावे चर्चेत आली आहेत








