बाप म्हणून आजवर माझ्या लेकीचे अनेक अभिमानास्पद क्षण अनुभवले..पण काही क्षण असे असतात की शब्द हरवून जातात..माझी अवनी, वय वर्षे फक्त 7, मी गोमुख-तपोवन अर्थातच हिमालयात ट्रेकींगसाठी निघालो असताना तिने हट्ट धरला, मलाही हिमालय सर करायचांय, पण मला टेंन्शन होतं, तिला जमेल की नाही, पण आज मला तिचा प्रचंड अभिमान वाटतोय, कारण ती सोबत आली आणि ती जिंकलीही, आज ती गोमुख-तपोवन सर करणारी सर्वात लहान हिमालयीन ट्र्रेकर ठरलीय, हे सारं काही समोर ठेवताना जगप्रसिध्द नेत्ररोगतज्ज्ञ आणि ट्रेकींगची मनापासून आवड असणारे डॉ.स्वप्नील भालेकर अगदी भावुक झाले होते, होय, कारणही तसेच होते, शिरुर शहरात राहणाऱ्या सात वर्षोंच्या चिमुकल्या अवणीने आपल्या वडीलांसोबत मोठ्या ह्ट्टाने हिमालय सर केला आहे, म्हणूनचं तिच्या वडीलांकडून अवणीच्या या प्रवासाचे किस्से सांगताना त्याचं मन गहिवरुन येतंय. तर अवणीच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. चिमुकल्या ट्रेकरच्या या विशेष कामगिरीचे आता शिरुरकरांकडूनही भरभरुन कौतुक होतंय. तिची आई डॉ.सोनल भालेकर या देखील आपल्या छोट्या लेकीच्या मोठ्या यशानं भारावून गेल्यात.
प्रसिध्द नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.स्वप्नील भालेकर यांना नवनवीन ठिकाणी आव्हानात्मक ट्रेक करण्याचा प्रचंड छंद आहे. दृष्टीहिनांना जग दाखवणारा हा माणूस सतत रुग्णांच्या सेवेत व्यस्त असतो, तरीही वेळात वेळ काढून ते आपला ट्रेकींगचा छंद वेळोवेळी जोपासताना दिसून येतात. यावेळी त्यांनी गोमुख-तपोवन येथे ट्रेकींगला जाण्याचं नियोजन केलं, पण त्यांच्या लहानग्या मुलीने अर्थातच अवणीने त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. एवढ्या लहान वयात हे शक्य होणार नाही असे वाटले, परंतु लेकीच्या हट्टापुढे वडीलांचे काहीचं चालले नाही, शेवटी तयारी पूर्ण झाली आणि 14 हजार 650 फुट उंचीवरील तपोवनचा प्रवास सुरु झाला. इथे पोहोचण्यासाठी शरीराची ताकद,मनाची तयारी आणि तितकीच जिद्द व चिकाटी लागत असते, गंगोत्रीपासून सुरु झालेला त्यांचा ट्रेक पुढे 20 कि.मी.चालत गोमुखपर्यंत पोहोचला. गंगामाईचा उगम अनुभवत हीच वाटचाल तपोवनच्या दिशेने सुरु राहीली. अरुंद रस्ते, धोकादायक, ढासळत्या दरडी, ऑक्सीजनची प्रचंड कमी, कडक थंडी आणि डोंगराच्या कडेने खोल-खोल दऱ्या, कित्येकदा तिला उचलून खांद्यावर घेत डॉक्टरांना तिला पुढे न्यावे लागले, पण ती देखील न थकता, न घाबरता एकेक पाऊ ल पुढे टाकत होती, रात्रभर तंबूत कडक थंडीत झोपणं, 6 फुटांच्या स्लीपिंग बॅगमध्ये 4 फुटाची अवणी हरवून जाणं, कमी ऑक्सीजनमुळे डोकं दुखणं, सगळं सहन करीत ती मनाने खंबीर राहीली. भोजवासाकडे जाताना एक अत्यंत धोकादायक ठिकाण लागलं ज्याला तिथले स्थानिक कच्ची धानी म्हणून संबोधतात, इथे एक अरुंद पाऊ लवाट..एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला डोंगराच्या कडेलाच सैल माती आणि अवाढव्य दगड हे इतके अस्थिर होते की साध्या हवेच्या झोताने देखील घरंगळून खाली यावेत. दुपारनंतर त्यांचा हा प्रवास भोजवासाला पोहोचला आणि तिथेच मुक्काम ठोकला. दुसरा दिवस होता तपोवन गाठण्याचा, तिसऱ्या दिवशी पहाटेच सकाळी पाच वाजता उठून 6 वाजताच गोमुखकडे रवाना झाले. इथे गंगा नदीपार करताना पुढचा रस्ता होता खडकाळ दगडांनी भरलेला तसेच निसर्गाच्या अफाट सौंर्द्याने सजलेला. खडतर रस्त्याने गोमुखला पोहोचले, नंतरचा प्रवास होता तपोवनचा. चढाई प्रचंड कठीण, रस्त्यात विशाल दगड, वाट फारचं अरुंद व निसरडी, एका बाजूला खोल दरी, इतकी भीतीदायक की मोठ्यांचीही पावलं थबकावीत. संध्याकाळी शेवटी दोघेही तपोवनला पोहोचले. पावसाच्या सरी, प्रचंड थंडीत डॉ.भालेकर यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि अवणीच्या डोळ्यात तपोवन सर केल्याचा आनंद. अशीही यशस्वी 16 हजार 650 फुटांची चढाई बाप-लेकीने पूर्ण केली आणि हिमालय सर करणारी सर्वात लहान ट्रेकर म्हणून तिच्या या प्रवासाची नोंद झाली. यापेक्षा आणखी वेगळा आनंद तिच्या आई-बाबांसाठी आणखी काय असून शकतो. अवणीच्या या धाडसाचं, तिच्या जिद्दीचं, चिकाटीचं आणि हट्टाचं शिरुर तालुक्यातूनचं नव्हे तर महाराष्ट्रातून कौतुक होतंय.
आपल्या छोट्या मुलीची ही मोठी कामगिरी पाहून अवणीची आई डॉ.सोनल भालेकर या देखील प्रचंड भावुक झाल्यात, त्यांना आज त्यांच्या लेकीचा प्रचंड अभिमान वाटतोय. तिचे कौतुक होताना पाहून त्यांचेही डोळे पानवताहेत. अवनीच्या या धाडसाचं संवादच्या वतीनंही मनापासून कौतुक !








