पूव नेते सायकल वरुन प्रचार करायचे, गांवातील लोक वर्गणी गोळा करुन आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी पुढाकार घ्यायचे, आपल्या नेत्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे अशी कार्यकर्त्यांची मानसिकता होती, कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांप्र्रती प्रचंड आदरभाव होता तर नेत्याला आपल्या वरिष्ठांप्रती प्रचंड निष्ठा व आपुलकी होती, म्हणूनचं राजकारणात प्रामाणिकपणाला व निष्ठेला त्या काळात प्रचंड महत्व होतं, नेते प्रामाणिक कार्यकर्त्यांला आवर्जून न सांगता संधी द्यायचे, म्हणूनच राजकारणात नैतिकता टिकून होती, आपलेपणा जपून होता, माणूसकी होती, पण आता दिवस बदलले तशी परिस्थिती बदलत गेली. राजकारण निष्ठेभोवती न फिरता ते आता स्वार्थाभोवती फिरु लागले, राजकारणातील प्रामाणिकपणाचे महत्व कमी झाले, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांचा विचार होऊ लागला आणि आर्थिक ताकदीला राजकारणात अधिक प्राधान्य मिळू लागले. यातूनच मग निष्ठा आणि प्रामाणिपणा मागे पडत गेला आणि राजकारणात सत्ता आणि पैशाला इतके महत्व प्राप्त झाले की, सर्वसामान्यांची चिंता करणारा प्रभावी नेताच आता राजकारणात उरला नाही ही वस्तुस्थिती आहे.
पूवी नेते कार्यकर्त्यांचं भल होण्यासाठी धडपड करायचे, आपला कार्यकर्ता आपल्या पायावर भक्कपणे उभा राहीला तर त्याच्या दैनंदिन जीवनात त्याला कोणतीच अडचण उभी राहणार नाही याचा विचार व्हावा, याचं भावनेतून निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिक्षणसंस्था, दूध डेअरी, सहकारी बॅंका, पतसंस्था किंवा स्वत:चा मोठा उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिलं जायचं, त्यामुळे सच्चा कार्यकर्ता आपल्या गरजा भागल्यामुळे नेत्यांप्रती आदर राखून असायचा, आपल्या नेत्यासाठी आणि आपल्या भागासाठी पूर्णवेळ खर्च करुन आपल्या पक्षासाठी मोठं योगदान द्यायचा, किंबहुना नेत्यांचा आदेश मानून त्या त्या भागातील आपल्या स्थानिक नेत्यांना पाठबळ देण्यासाठी पुढे असायचा, यातूनचं कार्यकर्ते घडत गेले, नेत्यांना बळ मिळत गेले आणि त्या त्या भागातील स्थानिक कार्यकर्ता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील खर्चाची चिंताही साहजिकच मिटल्याने नेतेही समाधानी असायचे.
आता मात्र प्रत्येकजण स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मोठा समजू लागल्याने आपण म्हणलं तसचं घडलं पाहीजे ही भावना स्थानिक पुढाऱ्यांमध्ये वाढू लागल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे निश्चितच बदलली आहेत.
अर्ध्या रात्रीत पक्ष बदलणारे वरिष्ठ नेते, केवळ राजकीय स्वार्थापोटी सहजपणे फुटणारे पक्ष आणि आपल्याला पक्षात किंमत मिळत नाही म्हणून तितक्याचं तीव्रपणे बंड करणारे बडे नेते यामुळे राजकीय निष्ठा धोक्यात आली आहे. यामुळे मोठ्या राजकीय पक्षांचे भविष्य देखील रात्रीत पालटताना आख्या देशाने अनुभवले आहे. याचं वाढत्या प्रवृत्तीमुळे आता सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हेच समीकरण सातत्याने समोर येत असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, सामजिक भान, सामाजिक जबाबदारी, विकासकामांमध्ये वेळोवेळी समोर येणाऱ्या त्रृटी, वाढत चाललेली कमिशनखोरी, भ्रष्ट व्यवस्था, अधिकाऱ्यांकडून सातत्याने सर्वसामान्यांची होणारी पिळवणुक, सतत होणारी पेपरफुटी यामुळे विद्याथ व तरुणांची बदलत चाललेली मानसिकता, राजकीय वरदहस्तामुळे वाढत चाललेले भेसळ माफीया यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत असलेला दुष्परिणाम, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, सध्या देशभरातून सुरु असलेली प्रचंड मंदीची लाट आणि राजकीय अनास्थेमुळे सर्वसामान्य व्यवसायीकांवर झालेला प्रचंड मोठा परिणाम, बदललेल्या राजकीय व्यवस्थेमुळे हतबल झालेले प्रामाणिक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यामुळे आता समाजात प्रचंड राजकीय उदासिनता दिसून येते आहे. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देवून व्यवसायीकांना योग्य पाठबळ देणे , त्यांना सावरणे आज काळाची गरज असताना इथे प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरु आहे, राजकीय व्यवस्थेत विरोधकांची किंमतही कमी होत चालली आहे तर सत्ताधारी कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, त्यामुळेच आज देश एका लादलेल्या हुकूमशाहीकडे झुकतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे.
ज्याला त्याला फक्त सत्ता हवी आहे, कुणी आपली सत्ता टीकविण्यासाठी आटापिटा करतो आहे तर कुणी सत्ता मिळविण्यासाठीची केविलवाणी धडपड करतो आहे.सर्वसामान्यांच्या मताला आता शुन्य किंमत उरली आहे. पैसे फेका, मते विकत घ्या आणि निवडून या याचं वाढत्या प्रवृत्तीमुळे महत्वाच्या प्रश्नांनाही आता बगल मिळते आहे तर सर्वसामान्यांच्या गरजांकडे आता सर्रास पाठ फिरवली जात आहे ही वस्तुस्थिती आहे. शेवटी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता , या चक्रातून ही व्यवस्था आता बदलायलाच तयार नाही. त्यामुळेचं तुमचं आमचं आयुष्य सध्या रामभरोसे सुरु आहे ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र कधी बदलणार ठावुक नाही, पण आता आपणचं स्वत:ला बदलून जागृक राहणे गरजेचे आहे.







