जोपर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत माणसांची माणसांशी जीवघेणी स्पर्धा सुरुचं असते. यावेळी त्याला कसलेही भान नसते, मनसोक्त जगण्याचे वेड नसते. माणसे एकमेकांबद्दल इर्षा बाळगतात, एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण करतात, कशासाठी तर मोठे होण्यासाठी, मोठं कशासाठी व्हायचं तर श्रीमंत माणूस बनण्यासाठी, श्रीमंती कशासाठी व्हायचं तर छान जगण्यासाठी, पण या सगळ्या चक्रव्युहात माणूस चांगलं जगणच विसरुन गेलाय. ही गती कुठे थांबणार आहे, कुणालाच ठावुक नाही परंतु माणूस नुसताच ट्रेनच्या गतीने धावतोय, यात तो स्वत:चं आयुष्य जगणं विसरुन गेलाय, समोर फक्त पैसा, पैसा आणि पैसा यापलिकडे माणसाला काहीचं दिसेनासे झाले आहे. जोपर्यंत माणूस माणसाच्या जवळ असतो तो पर्यंत त्याला माणसांची किंमत नसते, मात्र माणूस गेल्यानंतर तो किती चांगला होता, समाजात किती आदर्श निर्माण करणारा होता याबद्ददलची स्तुतीसुमने आपण सहजपणे उधळतो, परंतु तो जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याला सगळीच मंडळी नावे ठेवत असतात, त्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक न करता त्याला सतत मागे खेचण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतात, असलं कसलं जीवन आपण जगतोय, कुणालाच कळत नाही, अनादि अनंत काळापासून हा प्रवास असाचं अविरत सुरु आहे.
जग कधी बदलणार आहे ठावुक नाही ? माणसातील ही प्रवृत्ती कधी थांबणार कळत नाही ? पैशाच्या लोभापायी माणूस माणूसकी हरवत चाललाय, माणूस आपल्या माणसांपासून दुरावत चाललाय, प्रत्येकजण आपला स्वार्थ साधत फक्त मोठे होण्यासाठी धडपडतो आहे. कदाचित यामुळे आयुष्याला गती मिळेलही पण जीवनातलं खरं सुख मिळविण्यासाठी तो कधीच प्रयत्न करताना दिसून येत नाही. अर्थातच चांगले आरोग्य, सुखी जीवन आणि समाधानी आयुष्य माणूस कधीच अनुभवत नाही, वास्तविक सुखाची व्याख्याच आता बदलून गेल्याने माणसाचं आयुष्य दिशाहीन झालं आहे. पण जो माणूस सर्वांना मदतीचा हात देत, इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवताना स्वत: आहे त्यात समाधान मानून पुढे जातो, जीवनाचा खरा आनंद कशात आहे हे ज्याला कळलं तोच खरा सुखी माणूस असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. म्हणूनच पैसा जगण्यासाठी महत्वाचा आहेच, परंतु आयुष्य जगताना फक्त पैशाला प्राधान्यक्रम मिळू नये, तो जगण्याचे साधन जरुर आहे, पण जगण्यासाठी माणसाला आपल्या माणसांचं सुखही तितकचं महत्वाचं आहे हे विसरता कामा नये. आयुष्यभर पळापळ करुन जर शेवटी पदारात फक्त आजारांची शिदोरी मिळणार असेल तर आपण कशासाठी जगलो याचेही आत्मपरिक्षण होणे गजरेचे आहे. शेवटी पैशासोबत जगण्यासाठी निरोगी आरोग्यही महत्वाचं आहे. पैसा गरज पूर्ण करतो, पण माणूसकी धर्म माणसाला जगायला शिकवतो, म्हणूनचं माणूसकी सोडून वागू नका, फक्त पैशासाठी जगू नका, जीवन खुप मौल्यवान आहे ते फुकट वाया घालवू नका
Author: Sanvad Vahini
Post Views: 14








