शिरुर : 30 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरुर शहरातून शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरुर शहरातून शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी
आपल्या हातात अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम दर्शविणारे फलक घेऊ न घोषणाबाजीने नागरीकांमध्ये जनजागृती केली. रॅलीत सुमारे 120 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्याधाम प्रशाला, इंदिरा गांधी पुतळा, बस स्टॅण्ड मार्गे ही रॅली जैन
मंदिर, पाच कंदील चौक, राम आळी, बी.जे.कॉर्नरपासून पुन्हा विद्याधाम प्रशालेत आली. यावेळी विद्याधाम प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रशालेचे प्राचार्य तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारिरीक,मानसिक,
सामाजिक व कायदेशीर दुष्परिणाम याबाबतीत विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले.








