संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

शिरुरमध्ये सक्षम संस्थांमुळे शैक्षणिक क्रांती घडतेय, वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळतेय!

SHARE:

शिरुर, श्रीगोंदा, पारनेरची मुख्य बाजारपेठ म्हणूनचं अगदी कित्येक वर्षांपासून शिरुरने आपली एक वेगळी ओळख कायम ठेवली आहे. पूर्वीपासून तिन्हीही तालुक्यातील जनतेचा संपर्क नेहमीच शिरुर शहराशी राहीलेला आहे. त्यामुळे साहजिकच या तिन्हीही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक पर्याय म्हणून शिरुर शहराकडे पाहीले जाते. परंतु पूर्वीचा विचार केला असता विद्याधाम प्रशाला, रयत शिक्षण संस्था, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, सिताबाई थिटे फार्मसी कॉलेज याशिवाय शिक्षणासाठी अन्य इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेकांना उच्च शिक्षणासाठी पुण्याला जावे लागायचे किंवा आणखी सर्वोतम दर्जाचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पुण्याकडे धाव घ्यावी लागायची; परंतु जस-जसा शिरुरच्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत गेला, तशा लोकांच्या गरजाही वाढल्या.
याच उद्देशाने शिरुरला चांगल्या व परिपूर्ण शिक्षण व्यवस्थेची गरज भासू लागली. अशातचं सुरुवातीला बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना झाली. नंतर बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने बालाजी मराठी माध्यमही सुरु केले. नंतर पोद्ार शिक्षण संस्था आली. थिटे कॉलेजनेही स्वत:ची विजयमाला विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलाची उभारणी केली. माजी नगरसेवक रविंद्र धनक यांनी जीवन विकास मंदिरच्या माध्यमातुन एक परिपुर्ण शैक्षणिक संस्था उभी करुन आदर्श निर्माण केला. विकास पोखरणा यांनी व्हिजन इंटरनॅशनल स्कुल उभारले. मध्यंतरीच्या काळात सेंट जोसेफ स्कूलची उभारणी झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात आणखी एका चांगल्या संस्थेची भर पडली. डेक्कन एज्युकेशन संस्थेची भव्य इमारतही शिरुर शहरातील बाबुराव नगर परिसरात दिमाखात उभी राहीली. एकुणचं काय तर एकामागून एक चांगल्या शैक्षणिक संस्था शिरुर शहरात येत राहील्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली. पालक गुणवत्तेला अधिक महत्व देवू लागले. विद्यार्थीही प्रवेशाच्या बाबतीत अधिक जागृक झाले, म्हणूनचं शिरुर शहरात वाढत्या स्पर्धेमुळे शैक्षणिक गुणवत्ताही वाढत गेली, प्रत्येक संस्था आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत ही बाब पालक व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी पुढाकार घेवू लागली म्हणूनचं सर्वच शैक्षणिक संस्थाना आपल्या गुणवत्तेत अधिक वाढ करावी लागली, पालक व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून तशा सुविधाही प्रत्येक संस्थेने उभ्या केल्या आणि अप्रत्यक्ष मोठी शैक्षणिक क्रांती शिरुर शहरातून घडली, जी यापूव कधीही अनुभवायला मिळाली नव्हती. बालाजी शिक्षण संस्थेने सर्वसामान्यांना परवडेल अशी फी पालकांसमोर ठेवल्याने ‌‘बालाजी‌’ला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला, नंतर प्रत्येक संस्थेने आपले लक्ष गुणवत्तेबरोबरच योग्य फीकडेही केंद्रीत केले. त्यामुळे दर्जेदार शिक्षण आवाक्यात येण्यास या स्पर्धेमुळे मोठी मदत झाली आहे.
आज सर्वच संस्था आपापल्या पातळीवर चांगले शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सर्वोत्तम परिसर, उच्चशिक्षित शिक्षक, शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खास सुविधा आता सर्वच संस्थांनी पालकांसमोर ठेवल्या आहेत, त्यामुळे आजही काही संस्थामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकुणच वाढत्या स्पर्धेमुळे पालकांना व विद्यार्थ्यांना नक्कीचं मोठा फायदा होत आहे. ही नवी शैक्षणिक क्रांती शिरुरची ही भावी पिढी घडविण्यासाठी नक्कीचं मोलाचे योगदान देताना दिसून येत आहे एवढे मात्र निश्चित !!

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment