सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित विवाहीत महिलेने सासरच्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ समस्त सकल हिंदू समाज,शिरुर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,शिवबा संघटना,टाकळी हाजी अशा शिरुरमधील विविध संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन व भव्य मोर्चा काढण्यात आला होता, यात आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा संमत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी सांगितले.
हा मोर्चा शहरातील जुन्या पुणे-अहिल्यानगर मार्गाने बस स्थानकाच्या दिशेने शिरुर तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. त्यावेळी लांडगे बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरीक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी शिरुर तालुक्यात धर्मांतराच्या असंख्य घटना घडल्या असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले त्याचबरोबर तीन महिन्यात शिरुर तालुक्यातील अनधिकृत चर्च पाडा असाही सूर मोर्चामधुन समोर आला. विविध गावांमधून आमिष दाखवून धर्मांतर केले जात आहे, धर्म टिकला तर कुटुंब टिकेल, कुटुंब टिकले तर राष्ट्र टिकेल असेही यावेळी लांडगे यांनी सांगितले.
यावेळी मोर्चाच्या वतीने तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.








