लेखक : मदन काळे (शिरूर, पुणे )
मोबाईल : 9665 992 992
आयुष्याच्या या रणांगणात संघर्ष करताना अनेकदा कसोटीचा प्रसंग आला,पण खरं सांगतो कधीही मैदान सोडून गेलो नाही, उलट अशाचं घटनांनी मला जगणं शिकवलं, माणसे वाचायला शिकवली, जी माणसे नेहमी आपल्या पुढे पुढे करतात, तोंडावर कौतुक करतात हीच माणसे मी मागून वार करताना अनुभवली आहेत. आपल्याचं कल्पनांचा वेध घेऊन स्वत:चं दुकान मांडू पाहणारी ही मंडळी मग कधी आपले जवळचे शत्रू होऊ न जातात कळत देखील नाही, आपण आपल्या ध्येयाप्रती सरळ व प्रामाणिक असतो त्यामुळे आपण सगळं काही समाजासमोर आहे तसं मांडत जातो, पण याचाही आपल्याला प्रचंड मनस्ताप होऊ शकतो याची अनुभूती येताना मात्र अनेकदा मन विषन्न होतं, पण अशा घटनांमधुन मी पुन्हा पुन्हा सावरलो आणि अविरतपणे चालत राहीलो, म्हणूनचं मला नेहमीचं यशाचा मार्ग मिळत गेला.
पण खरं सांगू अनुभवातून माणूस शिकतो असे म्हणतात, पण प्रत्येकवेळी वेड्या माणसांनीचं मला शहाणं बनवलं आहे हेही तितकेच खरे आहे. खरं तर आता सच्चाईचा जमानाचं उरलेला नाही, पण काहीही झालं तरी आयुष्याच्या या अथांग प्रवासात जीवन जगायचं असेल तर कुणावर तरी विश्वास ठेवावाचं लागतो अन्यथा माणूस समाजात जगूचं शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनचं मग अनेकदा विचार आला आपल्याला वाटेल तसं आपण जगायचं. फक्त आपल्या जगण्यानं आणि वागण्यानं इतरांना त्रास होऊ द्यायचा नाही. एवढाचं ध्यास मनात होता. त्यामुळे मला खुप छान जगता आलं. आयुष्यात कधीचं कुणाचा विश्वासघात करायचा नाही. लांड्या लबाड्या करुन पैसा उभा करायचा नाही. आयुष्यात कधीचं कुणाचा तळतळाट घ्यायचा नाही. कुणाची कधीही फसवणुक करायची नाही, या तत्वांचा मार्ग मी समोर ठेवला त्यामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास खरचं सुखकर होत गेला.
माझ्या या वाटेत यामुळे अनेकदा काटेही आले, पण त्याच काट्यांवरुन चालताना मला अनेकांनी मायेची उबही दिली. म्हणूनचं अनुभवांची ही शिदोरी घेत असताना समाजाने मला खुप काही शिकवलं आणि खुप काही दिलंही, त्यामुळे मी घडत गेलो आणि विरोधकांमुळे माझ्या ध्येयापर्यंत जाण्याचं मला बळ मिळालं, म्हणूनचं माझ्या या वाटेत ज्या ज्या व्यक्तींनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. एकुणचं माझ्या या यशात सर्वात महत्वाचा वाटा विरोधकांचाही आहे असे मी मानतो. माझ्या मनातल्या संकल्पना इतरांसमोर मांडताना अनेकदा विश्वासघातही पदरी आला, पण यामुळे पराभवाची चिंता कधीचं केली नाही. म्हणूनचं कोसळतानाही पुन्हा उठलो. माणूसकी सोडून कधीचं वागलो नाही, म्हणूनचं हरतानाही नेहमीचं जिंकलो हा माझा अनुभव आहे.
म्हणूनचं मित्रांनो, असं जगा की,गर्वाने छाती भरुन यावी, असं काम उभं करा की, दुनियेनेही आपल्याला सलाम करावं, असं कर्तुत्व निर्माण करा की, आपल्यालाही जगण्याची ऊर्जा मिळावी.. खरं सांगतो या विचारांपेक्षा जगात खरचं दुसरं सुख
कुठलचं नाही. कारण विरोध आहे म्हणून आपल्या यशाला धार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा !!








