प्रिये, आपण खुप चांगले मित्र आहोत, त्यापलिकडेही आपण एकमेकांचे खुप छान हितचिंतक आहोत, एकमेकांचे विचार एकमेकांना सहजपणे भावतात म्हणून तर आपण तासन्तास गप्पांमध्ये हरवून जातो, पण खरं सांगतो तुझ्याशी बोलताना मनाला प्रचंड उभारी मिळते, आयुष्यात काहीतरी करण्याची, नव्याने उभे राहण्याची प्रचंड मोठी प्रेरणा मिळते, म्हणूनच अनेकदा वाटतं आपलं बोलणं कधी संपूच नये, तू माझ्यासमोरुन कधी जावूच नये, आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर आपण अचानकपणे एकमेकांना भेटलो, आपली खुप छान मैत्री आहे, तू माझा आदर करतेस, मीही तुझा मनापासून प्रचंड आदर करतो, आपण विभिन्न क्षेत्रात काम करतो तरीही तुझ्या मनात समाजा प्रति असणारा आदरभाव मनाला प्रचंड भावतो, एखाद्याचं दु:ख तू स्वत:चं म्हणून समजून घेताना माझं मन भरुन येतं. तू प्रचंड हळवी आहेस, कदाचित तुझ्या परिस्थितीने तुला तसं बनवलं असावं, पण तू आतून तितकीच खंबीर आहेस याचाही मी वेळोवेळी अनुभव घेतला आहे.
तू स्वत:च्या कामाला महत्व देणारी आहेस, तितकीच प्रॅक्टीकल आहेस, स्वत:च्या विचारांवर ठाम आहेस अणि सर्वसमावेशक विचार करणारी आहेस, जर तर वर तुझा अजिबात विश्वास नाही, मी यशस्वी होणारचं, मी विजेता होणारचं, मी माझ्या ध्येयापर्यंत जाणारचं ही तुझ्या मनाची उभारी पाहून तर तू माझ्या मनात स्थान निर्माण केलं आहेस, आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला कुणी तरी समजून घेणारं असावं असं प्रत्येकाला नेहमीच वाटतं, जगण्याच्या वाटेत असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करताना आपल्या वाट्याला असंख्य सुख, दु:ख येतात, परंतु अडचणीच्या काळात आधार देणारा माणूस असला की अधिक उभारी येते, खरं सांगू तू माझी प्रेरणा आहेस, तुझ्यातील प्रचंड आत्मविश्वास, उत्साह आणि आयुष्यात काहीतरी करुन दाखविण्याची तुझी जिद्द माझ्या मनात प्रचंड ओढ निर्माण करते. तू खुप सुंदर आहेस, उच्च शिक्षित आहेस, तुझ्या विचारांमध्ये प्रचंड ठामपणा आहे, तुझ्यात प्रचंड माणूसकी आहे, आपलेपणा आहे, सर्वांना समजून घेत आपल्या सोबत घेवून जाण्याची तुझ्यातील वृत्ती मला प्रचंड भावते, म्हणूनचं तुझा सहवास मला नेहमीच हवा-हवासा वाटतो. खरं सांगू तू बोलत राहीलीस की असं वाटतं, तुझं बोलणं कधी थांबूचं नये, तू मला जवळचा आधार वाटतेस, म्हणूनचं मला तू मनापासून हवी आहेस, प्लीज, गैरसमज करुन घेऊ नकोस, पण आता मनातलं प्रेम मी खरचं नाही लपवू शकतं, तू मला मनापासून खुप खुप आवडतेस, माझं तुझ्यावर मनापासून खुप खुप प्रेम आहे, माझ्या मनातील भावना कदाचित तूही जाणल्या असशील, कदाचित तुझ्याही मनात माझ्याविषयी प्रेम असेल तर प्लीज मला होकार देशील ना ? मी तुझ्या होकाराची आतुरतेने वाट पाहतोय!







