शिरुर शहरातील हलवाई चौकाजवळील सरदार पेठेतील अमोल ज्वेलर्स ॲण्ड सन्स प्रा.लि. या ज्वेलरी शॉपवर 24 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 कोटी 38 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना भर बाजारपेठेत घडल्याने शिरुर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत. घटनेनंतर पोलिस पथकानं पहाटे परिस्थितीची पाहणी करुन 4 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत अमोल ज्वेलर्स ॲण्ड सन्स प्रा.लि. ज्वेलरी शॉपचे मालक वैभव पुरुषोत्तम जोशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शिरुर शहरात हलवाई चौकाजवळ सरदार पेठ येथे वैभव पुरुषोत्तम जोशी यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अमोल ज्वेलर्स ॲण्ड सन्स प्रा.लि.नावाचे ज्वेलरी शॉप आहे, इथे सोने व चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते, सणासुदी निमित्ताने जोशी यांनी आपल्या शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरला असताना चोरट्यांनी पहाटेच्या परिस्थितीचा फायदा उठवत 4 च्या सुमारास दुकानाचे शटर्स उचकटून, आतील काचा फोडून दुकानातील सोन्याचे 760 ग्रॅमचे दागिणे व चांदीचे एकुण 77 किलोंचे दागिने लंपास केले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपासणी केली असता एका मारुती व्हॅनच्या सहाय्याने चोरट्यांंनी ही चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे, यादृष्टीने पोलिस पुढील तपास करीत आहेत. शिरुर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एका ज्वेलरी शॉपच्या दुकानातून एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने व चांदीचे दागिने चोरुन नेल्याची ही पहिलीच घटना असावी. या घटनेमुळे बाजारपेठेतील व तालुक्यातील सर्वच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे 4 वाजता सुरु झालेला चोरीचा प्रयत्न सुमारे 4.35 पर्यंत सुरु होता असे सीसीटीव्हीतून निदर्शनास येत आहे. चोरट्यांकडे हत्यारे असल्यामुळे नागरीक जागे होवूनही प्रतिकार करण्यास पुढे येऊ शकले नाहीत. शिरुर शहराच्या अगदी मध्यवत भागात अर्थातच बाजारपेठेतच हा जबरी दरोडा पडल्याने परिसरातील नागरीकही धास्तावले आहेत, सणासुदीच्या काळातचं भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने शिरुर तालुका व परिसरातून प्रचंड खळबळ उडाली आहे.
