संवाद वाहिनीचा पुढील अंक दिवाळी विशेषांक – 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोबर 2025

दिवाळी फराळाची परंपरा एक हजार वर्षांची, हिवाळ्यात काळजी घेतो आरोग्याची, मिळते ऊ र्जा, वाढतो उत्साह, संधी मिळते आपले शरीर आतून फीट ठेवण्याची!!

SHARE:

आपल्या सण उत्सवांना, परंपरांना आणि विविध ऋतुंना आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्राची झालर आहे, म्हणूनचं आपल्या सण उत्सवातून, परंपरेतून आणि विविध ऋतुंमधुन याची झलक सातत्याने दिसून येते, आपले पूर्वज हजारो वर्षांपूवही आरोग्याबाबत किती जागृत होते याचा प्रत्यय आपल्याला या परंपरा आणि उत्सवांमधुन पहायला मिळतो,त्या कालखंडातील ऋषीमुणींनीही त्या त्या ऋतुनुसार आपल्या सण, उत्सव आणि परंपरा यांची रचना करुन त्या त्या सणांनुसार आपली कार्यपध्दती कशी असावी याचे सूत्र तयार करुन ठेवले आहे, आजही हीच परंपरा हजारो वर्षांपासून कायम आहे. जो या सुत्रांचे पालन करतो त्या व्यक्ती आयुष्यात निरोगी आणि सुखी जीवन जगत आहेत असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये.
वास्तविक पाहता दिवाळीचा फराळ म्हणजे त्या आहार परंपरेचा परिपाकच. फराळाचा अर्थ खाण्यापिण्याची चंगळ असा नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरणाच्या बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक करणारा आहार असा आहे. दिवाळी हेमंत ऋतुत येते. त्यामुळे दिवाळीत तेल- उटणे लावून केले जाणारे अभ्यंग स्नान, फराळाचे तेलकट, तुपकट, गोडधोड पदार्थ या सर्व गोष्टींचा संबंध हेमंत ऋतुसाठी सांगितलेल्या ऋतुचर्येशी जोडला जातो. या ऋतूत थंडी वाढते, त्यामुळे भूकही वाढते. या वाढलेल्या भुकेला ग्रंथात अग्नी प्रदीप्त होणे असंही म्हणतात. या पेटलेल्या अग्नीला पचण्यास जड असणारे पदार्थच देणे आवश्यक असतं. त्यामुळे या दिवसांत पुरेसा किंवा पचायला थोडा जड असलेला आहार घेतला नाही तर बद्धकोष्ठता, पोटात वायू धरणे, मूळव्याध असे त्रास वाढण्याची शक्यता दिसून येते. म्हणून हेमंत ऋतूत व्यवस्थित पोटभर खाण्यास सांगितलं जात. इतर वेळी अगदी अनहेल्दी ठरवला जाणारा आहारही या ऋतूत चालणारा असतो. या दिवाळी फराळातील प्रत्येक पदार्थामागे आरोग्याला फायदे देणारेच गुणधर्म असतात. त्यापैकी काही पदार्थांविषयी आपण जाणून घेऊयात. सुरवात करुयात या फराळाचा शुभारंभ ज्या पदार्थाला शुभ मानून केला जातो तो पदार्थ म्हणजे करंजी…
-करंजी : करंजीसाठी लागणाऱ्या सारनामध्ये वापरले जाणारे रवा,तूप, चारोळी, खसखस, वेलची, सुके खोबरे, सुकामेवा किंवा मऩुके हे घटक शरिरासाठी उपयुक्त ठरतात. त्यात वापरला जाणारा रवा हा कोलेस्ट्रॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री असतो. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे, किंबहुना मधुमेह रोगींसाठी रवा उत्तम आहार आहे. कारण याचे ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो. त्यानंतर साजूक तुप. अर्थातच तुपामुऴे थंडीत रुक्ष पडलेल्या त्वचेला आतून आर्द्रता प्राप्त होते. चारोळी रुची यावी म्हणून जशी वापरतात तसंच ती लहान मुलांसाठी उत्तम टॉनिक आहे. चारोळीत तीस टक्के मांसवर्धक पदार्थ व साठ टक्के स्निग्ध पदार्थ आहेत. खोकल्यासाठी आणि त्वचाविकारात चारोळी फायदेशीर ठरते. त्यानंतर खसखस अतिसार, कॉलरासारखे वारंवार जुलाब होणे, जुनाट ग्रहणी, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतड्यातील रक्तस्राव, शुक्रदौर्बल्य इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे. सुके खोबरे हे अत्यंत शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक आहे. तसंच रक्त वाढते, व्हायटॅलिटी सुधारते, हाडाच्या हट्टीविकारांतही सुके खोबरे उपयुक्त ठरते, पोटातील गॅसची समस्य़ा दूर होण्यास मदत होते. वेलची गुणाने रूक्ष, कफ, पित्त दोन्हींवर काम करणारी, शरीराला हलकेपणा आणणारी आहे. रक्तविकार, तहान, मळमळ, उचकी, कोरडा खोकला, मूत्रविकार, डोळ्यांचे विकार, केसांचे व डोक्याचे विकार, शरीराचा दाह, मुखविकार यासर्वांमध्ये वेलची गुणकारी ठरते. सुकामेवा किंवा मनुका शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यात मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात.
-बेसनाचे लाडू : यात वापरले जाणारे घटक म्हणजे बेसन,साजूक तूप, दूध,सुकामेवा. बेसन हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. मांसपेशींना येणारी सूज कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरते. बेसनमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते. इतकंच नव्हे तर ज्यांना ब्लड प्रेशर, शारिरीक थकवा अथवा वेट लॉस करायचा असेल किंवा डायबिटीजच्या पेशंटसाठी त्यांच्या भुकेला क्षमविण्यासाठी बेसनाचे पदार्थ उपयुक्त ठरतात. साजूक तूप, दूध,सुकामेवा लोह, पोटॅशियम शरीरातील ऊब टिकविण्यासाठी फायदेशीर असतातचं.
-अनारसे – यामध्ये तांदूळ, तूप, गूळ, खसखस, तीळ. अनारशात वापरल्या जाणाऱ्या या घटकांमुळे रुची सोबतच या गुणांनी स्निग्ध असतात. अतिसारामध्येही हितकर असतात. त्यात वापरण्यात येणारा तांदूळ हा पोटासाठी थंड असतो आणि पचनक्रीयेत उपयुक्त असतो. भूक क्षमविण्यास फायदेशीर असतो. त्यानंतर गुऴ, परंपरेनुसार पदार्थांमध्ये गुळाचा वापर अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शारीरिक अशक्तपणावर गुळ अतिशय लाभदायक आहे. शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो. थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असतं. डायबिटीज रुग्णांसाठीही गुळ खाणं फायद्याचं ठरतं. तिळामुऴे थंडीत शरीराला उब मिळते. तीळ हे उष्ण व स्निग्ध असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करुन थंडीपासून संरक्षण करतात. तिळामुळे वात-कफनाशक, पचनशक्ति, रोगप्रतिकारशक्ति व स्मरणशक्ति वाढण्यास मदत होते. यांतील कॅल्शियम हाडांसाठी चांगले असते. तिळाच्या वापराने मानसिक विकार कमी होतो, तणाव, नैराश्येपासून मुक्त राहता येत. तिळ केसांसाठी वरदान असतं.
-पिवळ्या मुगाचे लाडू – यासाठी पिवळी मूगडाळ, पिठीसाखर, साजूक तूप, जायफळ पूड, वेलचीपूड हे घटक वापरले जातात. पिवळय़ा मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक असते. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळ्या मुगाचे पीठ एक उत्तम टॉनिक आहे. बाळंतिणीस भरपूर दूध येण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात. मुगामुळे मेद वाढत नाही, पण स्नायूंना बळ मिळते. संधिवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ यासाठी फायदेशीर असतात. थंडीत होणाऱ्या सद-पडसे, खोकला, या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त असतात. जायफळपूड ही अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असते. पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निगा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन इ-3 व इ-6, कॉपर असतात जे शरीराला खूप फायदा देतात.
-पोह्यांचा चिवडा – या चिवड्यात वापरले जाणारे घटकांपैकी काही घटक म्हणजे पातळ पोहे, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, कढीपत्ता, हिरवी मिरचीचे तुकडे, धना-जिरा पावडर, मोहरी, हींग, तिळ. पोह्यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्यांना भरपूर एनज मिळते. पोह्यंमध्ये तांदळाच्या साळीतील रोगप्रतिकारक तेल काही प्रमाणात शिल्लक असते. त्यामुळे डोळे, त्वचा, केस, हाडे यांच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांनी हातसडीचा तांदूळ न मिळाल्यास पोहे जरूर खावे. कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, ॲमिनो ॲसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब-1, ब-2 व क जीवनसत्त्वही असते. त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व यातूनच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपक, पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन बी-6, लोह, कॉपर, पोटॅशियम, प्रथिने आणि कर्बोदकाचा समावेश असतो. ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो. पचन होण्यास मदत होते. मधुमेहाच्या पेशंटला त्यांची शुगर लेव्हलसाठी तर मिरची खाणं अतिशय फायदेशीर असतं. शेंगदाणे हे प्रोटीन, फॅट आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असतात. शेंगदाण्यामध्ये नायसिन, थायमिन, फॉलिक ॲसिड, कॉपर, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखी अनेक उपयुक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शेंगदाणे हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होण्यास मदत होते. धऩा-जिरा पावडरमुळे शरीरातील सर्व 72 हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. किडनीस्टोन विरघळतात. लघवीचा त्रास कमी होतो. शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते. पोट साफ होण्यास मदत होते. हिंगाच्या सेवनानं पोटाचे विकार कमी होतात. अशा पद्धतीनं दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांपासून ते तिखट पदार्थांमधल्य़ा मसाल्यांपर्यंतचे सर्व गुणधर्म शरिरासाठी उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे दीपावलीचा हा सण आनंदाचा तर असतोच, पण तो व्यवस्थित, पारंपरिक पद्धतीने साजरा केला तर त्यातून शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यासाठीही लाभ होतो आणि वर्षभर लागणाऱ्या उर्जा व शक्तीचा शुभारंभही यातून करता येतो. मात्र हा आहार पौष्टीक असला तरिही सहज पचेल अशा स्वरूपात व प्रमाणातच घ्यायला हवा. प्रमाणापेक्षा अधिक आहार घेणे, किंवा अत्यल्प प्रमाणात आहार घेणे अशा दोन्हीही गोष्टींमध्ये समतोल मात्र राखता आला पाहिजे तरच तो आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरेल. हा दिपावली सण आपणा सर्वांना आनंदाचा,दिव्यांच्या रोषणाईसारखा समृद्धीचा आणि आरोग्य संपन्नतेचा जावो हीच शुभेच्छा.

संस्कृती जपण्यासोबतच आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण-उत्सवाच्या योजना आपल्या चतुर पूर्वजांनी करुन ठेवल्या आहेत. आपल्या प्रत्येक सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. ज्यातला एक सणांचा राजा म्हणावा असा सण म्हणजे दिवाळी! उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात असणाऱ्या काळातच झाला अशी अख्यायिका आहे. त्यात दिवाळीच्या फराळाशिवाय दिवाळी अपूर्णच. पण हा फराळ जसा सर्वांना प्रिय आहे, तसाच तो शरीरासाठीही उपयुक्त ठरतो. आपल्या दिवाळ फराळाची किमान एक हजार वर्षांची परंपरा आहे. चकली, कडबोळी, लाडू, अनारसा, करंजी वगैरे अशा फराळामधील विविध खाद्यपदार्थाचा उल्लेख आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथातही आढळतो, मात्र या खाद्यपदार्थांची नावे या ग्रंथांमध्ये फार गमतीशीर नमूद आहेत. यामध्ये अपूप म्हणजे अप्पे किंवा घारगे, शालिपूप म्हणजे अनारसे, शंखपाला म्हणजे शंकरपाळे, सम्पाव म्हणजे सारोटी, मधुशीर्षक म्हणजे खाजे, शष्कुली म्हणजे करंजी, चणकपुरीका म्हणजे बेसनाच्या तिखट पुऱ्या, मुद्गलड्ड म्हणजे मुगाचे लाडू, सेविका म्हणजे शेवया, चक्रिका म्हणजे चकली वगैरे वगैरे!

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Sanvad Vahini

Leave a Comment

सबसे ज्यादा पड़ गई