प्रिये! माझे डोळे पानवताना, मन तुझे भरुन यायचे माझे हात नकळत, तुझ्या डोळ्यांपर्यंत जायचे ! फक्त तुझ्याचंसाठी लिहीलेली ही कविता आजही मनाच्या खोलवर कोरली गेली आहे. खरचं तू नसती तर माझं आयुष्य शुन्य होतं. तू माझ्या जीवनात आलीस अन् सारं आयुष्यच बदलून गेलं. कशासाठी जगावं? का जगावं? हे तू मला शिकवलंस. तू माझी प्रेरणा आहेस, तू माझे जीवन आहेस म्हणूनच तू मला अगदी मनापासून आवडतेस. आयुष्यात मी खुप स्वप्ने पाहीली. दोघांना एका चौकीटीत बंद करुन आपलं एक वेगळं विश्व निर्माण करण्याची ताकद केवळ तुझ्यामुळेच माझ्यात निर्माण झाली. प्रिये तुला आठवतो तो दिवस? पहिल्या भेटीची ती गोड आठवण अजूनही मनात तशीच आहे. तो खळखळणारा समुद्र, त्या खडकावर अविरतपणे आदळणाऱ्या लाटा, अंगाला स्पर्शून जाणारा खोडकर वारा आणि आपण जीवनाच्या आणाभाका घेत एकमेकांच्या हातात दिलेला निरागस हात. त्यावेळी कल्पनाच नव्हती की, काही दिवसांतच आपले नाते इतके घट्ट होईल, आपण एकमेकांशिवाय राहूचं शकणार नाही, असे कधी वाटलेच नव्हते, परंतु मने जुळत गेली, शब्दांशी शब्दांचे धागे विनत गेले आणि आपल्या हळव्या प्रेमाचा सुखकर प्रवास सुरु झाला. खुप विचार करायचो, आपल्या जोडीदाराविषयीच्या असंख्य कल्पना मनात घोळत असायच्या, पण ती तूच असेल याची कधी कल्पनाच केली नव्हती. तू माझ्या मनात खोलवर स्थान निर्माण करशील असे कधी वाटलेच नव्हते.पण तू आलीस अन् माझ्या जगण्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. मला ठाऊक आहे, तुला खोटेपणाचा राग आहे, माणूसकी न ठेवणाऱ्या माणसांची चिड आहे, समाजाला फसवून आपली पोळी भाजणाऱ्यांची घृणा तुझ्या मनात नेहमीच असते, पण खरं सांगू, तुझ्या याच विचारांनी मी प्रभावित झालो. तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी खुप काही देऊ न जातो, तुझ्या नजरेची हळवी भाषा मनाला घायाळ करुन टाकते, तुझा नाजूकसा स्पर्श मला आयुष्यात खुप मोठं होण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच तू माझी असण्याचा मला मनापासून अभिमान आहे. तुझ्या नुसत्या सोबत असण्यानचं मी पुरता घायाळ झालोय, पण वास्तवाचे भान ठेवून जगण्याचा अर्थ तूच मला शिकवलास, मी हे कधीही विसरु शकत नाही. प्रेम हे प्रेम असतं याची जाणीव तुच मला करुन दिलीस, म्हणूनच प्रेमाच्या या हळव्या वाटेवर तुझ्या सुंदर विचारांचा गालिचा अंथरुन मी माझ्या जीवनाची वाटचाल अधिक सुखकर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न के ला आहे. यातही मी फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच यशस्वी झालो आहे. तू असच उमलत्या कळीसारखं नाजूकपणे हसत राहावं. माझ्या विचारांना प्रोत्साहन देवून उंच भरारी घेण्यासाठी माझ्या पंखाना बळ देत राहावं, असं नेहमीच वाटतं, आपला हा प्रवास असाच अविरतपणे सुरु राहावा, असे मनापासूनच वाटतं…पण त्यासाठी मला तुझी साथ आणि सोबत सदैव हवी आहे…देशील ना? कारण आजही पुन्हा पुन्हा सांगतो, माझे डोळे पानवताना, मन तुझे भरुन यायचे, माझे हात नकळत, तुझ्या डोळ्यापर्यंत जायचे, असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. म्हणूनचं मी तुला कदापीही विसरु शकत नाही, कारण माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.







